तासगाव प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील नागाव (निमणी) येथील सौरभ गुजले याने ग्रामीण भागातून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर व्यावसायिक रंगभूमी, मराठी मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत नेला आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या धमाल 4 या हिंदी चित्रपटात त्याचीही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
सांगली जिल्ह्यातील नागाव (निमणी) येथील सौरभ गुजले यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, नागाव येथे झाले. त्यानंतर पीडीव्हीपी महाविद्यालय, तासगाव येथून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. शेती करणाऱ्या कुटुंबातील सौरभला सुरुवातीपासून अभिनयाची विशेष पार्श्वभूमी नव्हती. त्याने सुरुवातीला सोशल मीडियावर विनोदी शॉर्ट व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली. त्याच्या अभिनयाची दखल घेत अनिकेत गवळी आणि अजय अष्टेकर यांनी त्याला आपल्या यूट्यूब वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधी दिली. याच संधीमुळे अभिनयाची खरी आवड निर्माण झाली.
अभिनयाचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी त्याने राजेश देशपांडे यांच्या 'सृजन द क्रिएशन' अभिनय कार्यशाळेत प्रवेश घेतला. तेथून रंगभूमीची ओढ निर्माण झाली. राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याने लेखक इरफान मुजावर यांच्याशी संपर्क साधला. दिग्दर्शक प्रताप सोनाळे यांनी रंगभूमीचा कोणताही अनुभव नसतानाही सौरभ यांच्यावर विश्वास ठेवत नाटकात मध्यवर्ती भूमिका दिली. तालमींसाठी गावाहून ये-जा करणे कठीण असल्याने अनेकदा सोनाळे यांच्या घरी मुक्काम करून त्याने एक महिना नाटकाची तयारी केली. या काळातील गुरुजनांचे सहकार्य त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला.
यानंतर राजेश देशपांडे यांनी त्यांना 'करून गेलो गाव' या पहिल्या व्यावसायिक नाटकात संधी दिली. या नाटकात भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांच्यासारख्या नामवंत कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. याच निमित्ताने त्याचा मुंबईशी पहिला परिचय झाला.
त्यानंतर सौरभने कलर्स मराठीवरील अबीर गुलाल आणि झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. मराठी चित्रपटांमध्येही त्याने काम केले. हिंदी चित्रपट धमाल ४ साठी दिलेल्या ऑनलाइन ऑडिशनमधील त्याचा अनुभव विशेष ठरला. पूर्वी एका चित्रपटात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करताना घेतलेला आदिवासी वेशातील फोटोच या ऑडिशनसाठी उपयोगी पडला. एकेकाळी तंबूमध्ये बसणारा कलाकार यावेळी व्हॅनिटी व्हॅनमध्ये होता. सेटवर अभिनेता रितेश देशमुख यांनी दिलेली आपुलकी आणि प्रोत्साहन हा त्यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय अनुभव ठरल्याचे तो आवर्जून सांगतो..
सध्या सौरभ हा 'बेबल्याचो घो' या व्यावसायिक नाटकात काम करत असून विविध चित्रपट आणि मालिकांमधील भूमिका साकारत आहेत. ग्रामीण भागातील एका तरुणाने मेहनत, सातत्य आणि स्वप्नांवरील विश्वासाच्या जोरावर केलेला हा प्रवास अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या