पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अन्वये राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित तयार करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम ‘सीबीएसई’च्या पाठ्यपुस्तकांपेक्षा अधिक प्रभावी आणि विद्यार्थीकेंद्रित ठरेल, असा विश्वास बालभारतीने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जोडणाऱ्या आणि कृती-उपक्रमांद्वारे शिक्षण देणाऱ्या या नव्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती दुसरी ते चौथी तसेच सहावीसाठी पूर्ण झाली आहे.
नव्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरावर भर न देता कृती, प्रयोग, खेळ आणि उपक्रमांच्या माध्यमातून संकल्पना समजावून सांगण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विविध कौशल्यांचा विकास आणि सामाजिक मूल्यांची जपणूक हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
नव्या पाठ्यपुस्तकांची ठळक वैशिष्ट्ये
कृती आणि उपक्रमांवर आधारित शिक्षण पद्धती
वैचारिक, सामाजिक आणि भावनिक विकासावर भर
लिंग समानता व मूल्यशिक्षणाचा समावेश
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी जोडणाऱ्या कथा, कविता व चित्रकथा
QR कोड, डिजिटल साधने आणि व्हॉट्सअॅप हेल्पलाइनची सुविधा
शिक्षकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना
विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणारी कौशल्ये
सर्जनशील विचार व लेखन
संवाद आणि संपर्क कौशल्य
नेतृत्व व सहकार्य भावना
जिज्ञासा आणि समस्या सोडविण्याची क्षमता
विषयांमध्येही बदल
भाषा विषयात वाचन संस्कृतीला चालना देणारे साहित्य समाविष्ट करण्यात आले आहे. विज्ञान आणि गणितात स्थानिक संदर्भ व इतिहासाशी जोडलेले ‘एक्सप्लोरेटरी’ शिक्षण देण्यात येणार आहे. इतिहास आणि भूगोल विषयांमध्ये राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावरील स्थानिक माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी सांगितले की, प्रकाशित झाल्यानंतर पाठ्यपुस्तकांमध्ये आढळणाऱ्या त्रुटींची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या अनुभवांच्या आधारे पुढील वर्षी आवश्यक सुधारणा केल्या जातील.
विद्यार्थी-पालकांना दिलासा
NEP 2020 नुसार अभ्यासाचा भार कमी करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रटाळ अभ्यासाऐवजी आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षण मिळणार असून याचा लाभ यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दुसरी ते चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या