प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या "नशामुक्त अभियान" अंतर्गत तासगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत खुजगाव येथील द्राक्षबागेत लावलेली गांजाची शेती उघडकीस आणली आहे.या कारवाईत तब्बल ३ लाख ५ हजार १०० रुपयांचा गांजा सदृश्य वनस्पतींचा साठा जप्त करण्यात आला असून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत भिमराव गुजले (वय ५७, रा. खुजगाव, ता. तासगाव) याने आपल्या द्राक्षबागेत कॅनबीस (गांजा) वनस्पतीची लागवड केल्याची गोपनीय माहिती तासगाव पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी,अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
द्राक्षबागेत आढळली गांजाची आठ झाडे
पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे खुजगाव गावातून वाघजाईकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक १८४ मधील द्राक्षबागेत छापा टाकण्यात आला. यावेळी द्राक्षवेलींच्या आड विविध ठिकाणी गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याचे निदर्शनास आले.
पंच, फोटोग्राफर आणि वजनकाटा धारक यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पंचनाम्यात तीन ते चार फूट उंचीची एकूण आठ गांजाची झाडे जप्त करण्यात आली.
या झाडांचे एकूण वजन १५ किलो २५५ ग्रॅम इतके असून त्यांची बाजारमूल्य ३,०५,१०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
*नशामुक्त अभियानाला बळ*
सांगली जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्री,साठवण आणि लागवडीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने "नशामुक्त अभियान" सुरू केले आहे. त्याअंतर्गत सातत्याने धडक कारवाया सुरू असून, गांजा लागवड करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत.
*तपास सुरू*
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे करीत आहेत.
*कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी*
पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. अभिजीत गायकवाड,सचिन कुंभार, विनोद पाटील,प्रशांत चव्हाण,अतुल माने,विठ्ठल सानप,विवेक यादव, संतोष माळी,सुरज जगदाळे,निलेश डोंगरे,अक्षय संकपाळ,चालक प्रताप पवार व दत्तात्रय काळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या