सांगली, दि. ४ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषद २०२६ च्या सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात तीनच उमेदवार उरले आहेत. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी ही माहिती दिली.
या मतदारसंघासाठी एकूण सात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामध्ये अपक्ष उमेदवार तानाजी भगवान पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाशी जवळीक असलेले आणि आमदार जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाळासाहेब उर्फ प्रताप धोंडीराम पाटील यांचाही समावेश आहे. या दोन्ही उमेदवारांच्या माघारीमुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवार
धैर्यशील ज्ञानदेव कदम (गोरेगाव-वांगी, ता. खटाव, जि. सातारा) — भारतीय जनता पक्ष
अभयसिंह खाशेराव जगताप (वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा) — राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)
किशोर हनमंत धुमाळ (गोडोली, सातारा) — अपक्ष
माघार घेतलेले उमेदवार
तानाजी भगवान पाटील (पुजारवाडी, आटपाडी, जि. सांगली) — अपक्ष
प्रताप (बाळासाहेब) धोंडीराम पाटील (उरण-इस्लामपूर) — अपक्ष
मयूर बाबासो पाटील (सांगली) — अपक्ष
संजय नायकू मेढे (मिरज) — अपक्ष
अर्ज माघारीनंतर आता या मतदारसंघात भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांच्या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून, आगामी काळात प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या