सांगली (प्रतिनिधी) : क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो संघभावना आणि समन्वय वाढविणारा एक उत्तम माध्यम आहे. लहान बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बालरंगभूमीच्या चळवळीला गती देण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांमध्ये संघटनकौशल्य वाढावे, तसेच त्यांच्या शारीरिक आरोग्याला चालना मिळावी, या उद्देशाने एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून येत्या दिनांक ६ व ७ जून २०२६ रोजी 'बालरंगभूमी क्रिकेट लीग' चा थरार रंगणार आहे.
दिनांक ६ व ७ जून असे दोन दिवस ऐरोली (नवी मुंबई) येथील युरो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर ही भव्य क्रिकेट लीग खेळवली जाणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून रत्नागिरी, जळगाव, पुणे, नंदुरबार, लातूर, परभणी, सांगली, इचलकरंजी, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अहिल्यानगर, ठाणे आणि कल्याण येथील बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांचे अधिकृत संघ ताकदीने सहभागी होणार आहेत.
सोशल मीडियावर रंगणार 'लाइव्ह' प्रक्षेपण
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मैदानावर रंगणाऱ्या या अटीतटीच्या सामन्यांचे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यामुळे राज्यभरातील रंगकर्मी आणि क्रीडाप्रेमींना या सामन्यांचा घरबसल्या आनंद घेता येणार आहे.
या लीगमध्ये सांगली शहरातून सहभागी होणाऱ्या संघात विल्सन वास्कर( संघप्रमुख), प्रदीप कुलकर्णी (उपसंघप्रमुख), श्रीनिवास जरंडीकर, संदीप पाटील, मनीष आपटे, प्रदीप कांबळे, दयानंद चंदनवाले, सचिन खुरपे, सचिन चौधरी, अमोद भिडे, वैभव वडगावे हे बालरंगभूमीचे प्रमुख पदाधिकारी व सक्रिय रंगकर्मी खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहेत.
बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित या अनोख्या क्रीडा महोत्सवाचा सर्व बालप्रेक्षक, नाट्यप्रेमी आणि पालकांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन माध्यमांतून आस्वाद घ्यावा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्तीतर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या