"द बंगाल फाइल्स"
सत्तेचा अहंकार,गुंडगिरी,दडपशाही आदींचा जेव्हा अतिरिक्त होतो आणि त्यात सर्वसामान्य माणूस सातत्याने भरडला जातो तेव्हा काळ स्वतः न्याय निवाडा करतो आणि जेव्हा काय न्याय निवाडा करतो तेव्हा तो कुणाचीही वय करत नाही. बंगाल मधून हेच दिसून आले आहे. सत्तेवरून पाय उतार व्हावे लागलेल्या तृणमूल काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना सध्या रस्त्यावर ज्या प्रकारे जनतेच्या रोषाला सामोरे जाव लागत आहे ते पाहता जनतेच्या मनातील खदखद दिसून येते.
गेल्या 15 वर्षापासून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेच्या बळावर आणि हिंसेच्या जोरावर हिंदूंचा अतोनात छळ केला,बांगलादेशी घुसखोरांना भारतात बसवले, विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. या अन्यायाची चीड बंगाली जनतेच्या मनात इतकी वाढली की त्याची दाहकता राज्यातील विविध भागात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होते.
कमारहाटी भागामध्ये तृणमूल काँग्रेसचे अत्यंत वजनदार नेते आणि जेष्ठ आमदार मदन मित्र यांच्या वाहनावर संतप्त आंदोलकांनी अंडी फेकून आणि त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला. या प्रकरणाची व्याप्ती केवळ रस्त्यावरील आंदोलनापुरती मर्यादित राहिलेली नाही तर कॊलकत्ता येथील पटवली पोलीस ठाण्याच्या परिसरातच तृणमूल काँग्रेस नेते दास गुप्ता यांना सुद्धा अशाच प्रकारे अंडे फेकून मारण्यात आली आहे. भूमी हडप करणे, लोकांना धमकावणे, याप्रकरणी त्यांच्यावर संतप्त लोकांनी राग काढला. यासह दास यांच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आपत्कालीन साहित्याची सामग्री आढळून आल्याचेही दिसून आले. सरकारच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. शिक्षक भरती घोटाळ्यापासून विविध योजनांमध्ये अनियमितता, स्थानिक पातळीवरील आर्थिक गैरव्यवहार आणि सत्तेच्या जवळ असलेल्या व्यक्तींवरील होणारे आरोप यामुळे या पक्षाची प्रतिमा मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधातील धग अजूनही जनतेच्या मनात घर करून राहिली आहे. अनेक ठिकाणी जनता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून पैसे वसूल करत असल्याचेही चित्र दिसत आहे. श्यामपूर भागात मनरेगा योजनेतील गैरव्यवहारावरून गावकऱ्यांनी तृणमूलचे नेते मन्ना यांना वेढा घालून खडसावले आणि पैसे परत मागितले.
बंगाली जनतेने आपल्या मनातील असंतोष मतपेटी द्वारे दाखवलाच पण त्यांच्या असंतोषाचा ज्वालामुखी अजून ही धगधगत आहे. कुठलीही हिंसा अजिबात समर्थनीय नाही पण आपण जे करतो तेच आपल्याला भोगावे लागते हा प्रत्यय तृणमूलच्या नेत्यांना आज आला आहे. लोकशाहीत अशा प्रकारचा विरोध होणे हे नवीन नाही. कोणत्याही सरकारला किंवा पक्षाला टीकेचा सामना करावाच लागतो. तथापि जेव्हा विरोध केवळ राजकीय प्रतिस्पर्धीकडून न होता सामान्य नागरिकांच्या पातळीवरून उघडपणे केला जातो तेव्हा ते अधिक गंभीर मानले जाते.
बंगालमध्ये आज हेच दिसत आहे बंगालच्या राजकारणाला प्रथमपासूनच हिंसेचा इतिहास लाभलेला आहे. डाव्या (साम्यवादी )आघाडीच्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ आणि जुलमी राजवटीत हिंसा हीच राज्य करण्याची कार्यपद्धत होती. ' हम करे सो कायदा' हे शब्दशः तेथे घडत होते. पुढे ममता बॅनर्जी यांनी साम्यवादांच्या सत्तेला सुरुंग लावून स्वतःची सत्ता स्थापन केली तेव्हा बंगालमधील सर्वसामान्य जनतेला मोठ्या परिवर्तनाची अपेक्षा होती पण तृणमूलने साम्यवाद्यांच्या दोन पाऊले पुढे जाऊन जनतेत हिंसा आणि भय निर्माण करायची परंपरा कायम ठेवली.
मागील विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज न भरून देण्यापासून त्यांच्या घरांची जाळपोळ करण्यापर्यंत करता येईल तितक्या हिंसा केल्या. पक्ष कार्यालयात अनेक पांढऱ्या साड्या आढळल्या. पुढे विरोधी पक्षांच्या पराभूत उमेदवारांना गाठून त्यांना मारहाण करणे, अत्याचार करणे त्यांची हत्या करणे आदी केले.
सत्तेच्या अमर्यादित अधिकारामुळे तृण्मुलचे नेते अहंकारीच नव्हे, तर हिंसाचारी तृणमूल काँग्रेस कुणालाही जुमानत नसल्याचे पाहून काळाने चक्र फिरवली. आज बंगालमध्ये सत्तांतरानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे हाल हाल होताना दिसत आहे. ज्याप्रमाणे त्यांनी लोकांना त्रास दिला होता तसाच त्रास आज त्यांना भोगतांना दिसत आहे. जे त्यांनी पेरले तेच आज उगवले आहे. कौटिल्य अर्थशास्त्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की ज्या राज्यामध्ये प्रजा नेहमीच भयभीत आणि त्रस्त असते तेथील सत्ताधीशांचे पतन निश्चित असते. अनाचारी आणि दुराचारी तृणमूल काँग्रेसच्या पतनाचे मूळ यातच आहे.
बंगालच्या हिंसे च्या दुष्टचक्रातून मुक्त करण्यासाठी आता सर्व स्तरावर तातडीने, गांभीर्याने, कठोरतेने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. बंगालमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचे दायित्व त्यामुळे मोठे आहे. सर्व प्रथम सर्व गुन्हेगारांना सरकारने कारागृहात डांबले पाहिजे, गुन्हे करणाऱ्यांवर बुलडोझर कारवाई केली पाहिजे, घुसखोरांना बंगलादेशात हाकलले पाहिजे धर्मांधांना वटणीवर आणलेच पाहिजे हे केले तरच बंगालमध्ये कायद्याचे राज्य पुनःस्थापित होऊ शकेल.
श्री. अमोल कुलकर्णी
फ्लॅट क्र 301, समृध्दी हाईट्स, शामराव कुंभार नगर, नाना पाटील नगर भाजी मंडई जवळ, कोल्हापूर - 416012
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या