प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव महसूल विभागाने अवैध खडी वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल सात डंपर जप्त केल्याने तालुक्यातील क्रशर चालक आणि खडी वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.जप्त करण्यात आलेले सर्व डंपर तासगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले असून,पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे समजते.महसूल विभागाच्या भरारी पथकाने तासगाव-कवठेएकंद रस्ता,जुना सातारा रस्ता तसेच तासगाव शहरातील जिजामाता चौक ते कॉलेज चौक या भागात विशेष तपासणी मोहीम राबवली.या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या सर्व डंपरमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त खडीची वाहतूक होत असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले.विशेष म्हणजे, जिजामाता चौक ते कॉलेज कॉर्नर परिसरात तीन डंपर पकडल्यानंतर त्यांना तहसील कार्यालयाकडे आणले जात असताना कारवाईच्या भीतीने चालकांनी वाहने रस्त्यावरच सोडून पळ काढला.मात्र महसूल विभागाच्या पथकाने तत्परता दाखवत ही वाहनेही ताब्यात घेतली.तासगाव तालुक्यात अवैध वाळू आणि मुरूम वाहतुकीवर यापूर्वी अनेकदा मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत.मात्र,खडी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एकाच दिवशी एवढी मोठी कारवाई प्रथमच झाल्याने खडी व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून,पुढील काही दिवसांत आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या