मुंबई प्रतिनिधी : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील जनआंदोलन तीव्र होत असताना शिराळा विधानसभा मतदारसंघाचे *आमदार मा. सत्यजित (भाऊ) देशमुख* यांनी पुढाकार घेत *एमएसआरडीसीचे चेअरमन मा. अनिल गायकवाड साहेब* यांच्यासोबत शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती, कामेरीच्या शेतकरी प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक घडवून आणली.
बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग हा शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेवर अन्याय करणारा असल्याचे ठामपणे मांडले. या महामार्गामुळे हजारो एकर सुपीक जमीन बाधित होणार असून अनेक कुटुंबे भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी महामार्गाच्या आवश्यकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राज्यात आधीच उपलब्ध असलेल्या रस्ते व दळणवळण सुविधांच्या पार्श्वभूमीवर नवीन महामार्गासाठी सुपीक शेतीचा बळी देणे योग्य नसल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली.
*आमदार मा. सत्यजित (भाऊ) देशमुख* यांनी शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आश्वासन दिले असून लवकरच आपण मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सोबत शेतकरी प्रतिनिधीची बैठक आयोजित करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकरी प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कामेरी शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे *गावचे सरपंच रणजित पाटील, सचिन जाधव, प्रकाश कदम, प्रा. संजय पाटील, शहाजी पाटील, इंद्रजित पाटील, सुधीर पाटील, संतोष माळी, सुदर्शन पाटील, विशाल माळी, आरीफ मुल्ला हे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या