प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन,पाऊस,वादळ आणि नैसर्गिक आपत्तींची पर्वा न करता जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी मोठा पुढाकार घेतला आहे.लाईनमन आणि इतर कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच अपघाताच्या प्रसंगी आर्थिक आधार मिळावा यासाठी विमा संरक्षण उभारण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.तासगाव येथील महावितरण कार्यालयात बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी अधिकारी, कर्मचारी आणि लाईनमन यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.काम करताना येणाऱ्या जीवघेण्या जोखमी, अपुऱ्या सुरक्षा साधनांमुळे निर्माण होणारे धोके आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले, "वीज कर्मचारी हे खऱ्या अर्थाने जनतेचे योद्धे आहेत. पाऊस,वादळ,पूर अशा संकटांच्या काळात सर्वप्रथम मैदानात उतरून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम ते करतात.त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी समाजासह लोकप्रतिनिधी म्हणून आपलीही आहे."यासाठी कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाचे सेफ्टी किट,हेल्मेट,ग्लोव्हज, सुरक्षा बेल्ट,इन्सुलेटेड उपकरणे यांसारखी अत्यावश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.तसेच अपघाताच्या प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी विमा संरक्षणाची प्रभावी व्यवस्था उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*कंत्राटी कंपन्यांना इशारा...*
बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील जोरकसपणे मांडण्यात आला.सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य न देणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली.अशा कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्तावही विचाराधीन घ्यावा,अशी भूमिका त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली.
*धोकादायक पोल आणि तारा तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश*
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जीर्ण व धोकादायक वीज पोल,लोंबकळणाऱ्या तारा आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या यंत्रणेची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.नागरिक आणि जनावरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
*शेतकऱ्यांसाठी दिलासा..*
वाढत्या वीजभारामुळे अनेक ठिकाणी डी.पी.वारंवार नादुरुस्त होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त तसेच उच्च क्षमतेचे डी.पी. बसविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन आमदार रोहित पाटील यांनी दिले.
वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ बैठकीपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीची भूमिका घेतल्याने महावितरण कर्मचारी आणि लाईनमनमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.तालुक्यातील वीज कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या