गगनबावडा : देशभरात ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय, मालमत्ता वाद, कौटुंबिक छळ, देखभाल भत्ता, पेन्शन आणि इतर न्यायालयीन प्रकरणांमध्ये वाढ होत असताना त्यांना वेळेत न्याय मिळत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या हक्कांसाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागत असून वाढते वय, आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक मर्यादा यामुळे ही प्रक्रिया त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची मागणी जोर धरत आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी संपूर्ण आयुष्य कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी योगदान दिलेले असते. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनाच न्यायासाठी न्यायालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेक प्रकरणांमध्ये वारंवार पडणाऱ्या तारखा, सुनावणीतील विलंब आणि वाढणारा खर्च यामुळे ज्येष्ठ नागरिक मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या खचून जातात. काही प्रकरणांमध्ये तर न्याय मिळण्यापूर्वीच संबंधित व्यक्तीचे निधन होते, ही वस्तुस्थिती अधिक चिंताजनक आहे.
विशेषतः मालमत्ता बळकावणे, घरातून बाहेर काढणे, मुलांकडून होणारा छळ, देखभाल करण्यास नकार देणे आणि आर्थिक शोषण यांसारख्या प्रकरणांमध्ये त्वरित निर्णय होणे आवश्यक आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंबामुळे अन्याय करणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक संघटनांकडून व्यक्त केले जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक संघटनांनी सरकार तसेच न्यायव्यवस्थेकडे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकरणांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. स्वतंत्र खंडपीठे, विशेष सुनावणी दिवस आणि फास्ट ट्रॅक न्यायालयांच्या माध्यमातून अशा प्रकरणांचा जलद निपटारा करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.
"न्याय मिळण्यात होणारा विलंब हा अन्यायासमान असतो," असे मत अनेक कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हयातीतच न्याय मिळावा, त्यांचा सन्मान आणि हक्क अबाधित राहावेत, यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना ही काळाची गरज बनली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कांचे संरक्षण करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून समाजाचे नैतिक कर्तव्यदेखील आहे. त्यामुळे "विलंबित न्याय म्हणजे ज्येष्ठांवर अन्याय" ही भावना लक्षात घेऊन शासन आणि न्यायव्यवस्थेने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या