कवलापूर प्रतिनिधी : कवलापूर येथील युवा की-बोर्ड व हार्मोनियम वादक निलेश नामदेव मोहिते यांना दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात कला सादर करण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे कवलापूरसह संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सोहळ्याचे आयोजन CMS छत्रपती मराठा साम्राज्य, दुबई यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोककला, शाहिरी परंपरा, पोवाडे आणि लोकगीतांचे सादरीकरण होणार आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमात शाहिरसम्राट डॉ. देवानंद माळी, शाहीर गंधर्व पृथ्वीराज माळी तसेच महिला शाहिरा कल्पनाताई माळी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या सादरीकरणांना संगीत साथ देण्याची संधी निलेश मोहिते यांना मिळाली आहे. दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात सहभाग मिळणे ही त्यांच्यासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
निलेश मोहिते हे गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असून की-बोर्ड व हार्मोनियम वादनाच्या माध्यमातून त्यांनी विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मंचांवर आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली असून त्यांना अनेक पुरस्कार व सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
दुबईतील शिवराज्याभिषेक सोहळ्यात कला सादर करण्याची मिळालेली संधी ही त्यांच्या कलाक्षेत्रातील वाटचालीतील आणखी एक मानाचा टप्पा ठरत असून त्यांच्या या यशाबद्दल कवलापूर परिसरातील नागरिक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या