प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगावच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवात भर घालणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटनेला यंदा २४० वर्षे पूर्ण होत आहेत. मराठा साम्राज्याचे कुशल मुत्सद्दी व धुरंधर कारभारी नाना फडणीस यांनी २ जून १७८६ रोजी तासगाव येथील प्रसिद्ध श्रीगणपती पंचायतन देवस्थान येथे भेट देऊन दर्शन घेतले होते. या ऐतिहासिक घटनेची नोंद आजही तासगावच्या इतिहासात अभिमानाने केली जाते.सन १७८५ मध्ये मैसूरचा शासक टिपू सुलतान याच्याविरुद्ध मराठे आणि निजाम यांच्या संयुक्त फौजांनी पहिली मोठी मोहीम उघडली होती. या मोहिमेत मराठा साम्राज्याचे प्रमुख कारभारी नाना फडणीस स्वतः सहभागी होते. मोहिमेतील यशस्वी कामगिरीनंतर परतताना त्यांनी तासगाव येथे मुक्काम करून गणेश पंचायतन मंदिरास भेट दिली होती.हे मंदिर मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी उभारले असून, ते तासगावच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचे प्रतीक मानले जाते. नाना फडणीसांसारख्या महान मुत्सद्द्याने या देवस्थानाला दिलेली भेट तासगावच्या इतिहासातील अभिमानास्पद घटना ठरली आहे.
यंदा या ऐतिहासिक भेटीस २४० वर्षे पूर्ण होत असल्याने इतिहासप्रेमी, संशोधक आणि तासगावकरांसाठी हा स्मरणाचा आणि गौरवाचा क्षण आहे. मराठेशाहीच्या वैभवशाली इतिहासातील या घटनेमुळे तासगावचे ऐतिहासिक महत्त्व पुन्हा अधोरेखित होत आहे.
“नाना फडणीसांच्या पावलांनी पावन झालेली तासगावची भूमी, आजही मराठेशाहीच्या वैभवाची साक्ष देत उभी आहे.”
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या