पलूस प्रतिनिधी : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक पटलावर आपला दबदबा वाढवला असून, मजबूत परराष्ट्र धोरण, डिजिटल क्रांती, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि प्रभावी नेतृत्वामुळे भारत 'विश्वगुरू' होण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे," असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री तथा ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पलूस येथील शिव शंभो मल्टीपर्पज हॉल येथे रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात अण्णासाहेब डांगे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते पुढारी आयकॉन पुरस्कार प्राप्त माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल उद्योजक सर्जेराव नलवडे, महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सौ. पुष्पावती मिठारी, तसेच सेंद्रिय कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रगतशील शेतकरी सुनील भोसले यांचा शाल, श्रीफळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा, स्मृतिचिन्ह आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे झाड देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना एकूण १,२०० झाडांचे वाटप करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत प्राथमिक टप्प्यात १२ प्रगतशील शेतकऱ्यांना विविध फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रताप पाटील आणि वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विशाल माने प्रमुख उपस्थित होते.
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी मोदी सरकारची वाटचाल आणि देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भाष्य केले.
डॉ. विशाल माने यांनी मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशभरात झालेल्या विकासकामांचा आणि विविध लोककल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. डिजिटल इंडिया, यूपीआयच्या माध्यमातून झालेली डिजिटल क्रांती, भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, 'ग्लोबल साऊथ'चे नेतृत्व, जी-२० अध्यक्षपदाचे यशस्वी आयोजन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक प्रभावात झालेली वाढ यामुळे भारताला जागतिक स्तरावर सन्मानाचे स्थान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णासाहेब डांगे म्हणाले, "अमेरिकेपासून ते रशियापर्यंत सर्व प्रमुख महासत्तांशी भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. जागतिक मंचावर भारताची विश्वासार्हता वाढली असून, प्रत्येक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय निर्णयप्रक्रियेत भारताचे मत आता प्रभावीपणे ऐकले जात आहे."
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रदीपआप्पा कदम यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अंकुश राजमाने यांनी केले, तर अभिजीत सावंत यांनी आभार मानले.
यावेळी नगरसेवक अमृत माळी, रामानंद पाटील, सरपंच प्रल्हाद जाधव, पोपटराव संकपाळ, अरविंद मदने, सूर्यकांत बुचडे, बाळासो जाधव, दिलीप पाटील, अशोक दाजी जाधव, रणजीत निकम, चंद्रकांत मोरे, संजय गोंदील, सागर सुतार, अजिंक्य पाटील, तसेच उल्हास पाटील, अनिल पाटील, तौफिक मुल्ला, रणजीत शिंदे, राहुल पाटील, महेश हजारे, अमीरभैया पठाण, आशिष सूर्यवंशी, शुभम निकम, कुलदीप वारे, हरीश वडार, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, संजय शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या