सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन स्थापित कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक (नागपूर) यांच्या विस्तार सेवा मंडळांतर्गत कार्यरत रविकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र, सांगली यांच्यावतीने आयोजित सांवत्सरिक पारितोषिक वितरण समारंभ गणेश मंगल कार्यालय, गावभाग, सांगली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्कृताध्यापक रघुवीर रामदासी यांनी प्रास्ताविकात केंद्रद्वारा बाल व युवा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संस्कृत प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची माहिती दिली. तसेच शालेय स्तरावर संस्कृत भाषेबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय संस्कृत स्पर्धा परीक्षांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अभ्यासिका कु. सोनल पारगांवकर यांनी संस्कृतमधून ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
यावेळी संस्कृत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकास प्रदान करण्यात येणारा “महामहोपाध्याय डॉ. पी. जी. लाळ्ये संस्कृत सेवा सन्मान पुरस्कार – २०२६” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, औंध (पुणे) येथील संस्कृत शिक्षक श्री. राघवेंद्र मोहन देशपांडे यांना प्रमुख पाहुण्या उद्योजिका सौ. भक्ती चितळे, कार्यक्रमाध्यक्ष श्री. बिपिन कुलकर्णी तथा चिन्मय मिशन, सांगलीचे आचार्य पुंडरीक चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
समारंभात बाल व युवा विभागातील संस्कृत प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच प्रौढ अभ्यासकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. राज्यस्तरीय संस्कृत स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या उपस्थित संस्कृत शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. भक्ती चितळे म्हणाल्या की, “संस्कृत भाषा ही भारतीय ज्ञानसंपदेचा मूलस्त्रोत असून संपूर्ण मानवजातीला कल्याणकारी विचार देण्याची क्षमता या भाषेत आहे. विविध शास्त्रांचा पाया अनेक संस्कृत ग्रंथांमध्ये आढळतो. भारतीय ज्ञान-विज्ञान परंपरेत संस्कृतचे अग्रगण्य स्थान असून या भाषेचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.”
विशेष सारस्वत उपस्थिती लाभलेले चिन्मय मिशन, सांगलीचे आचार्य पुंडरीक चैतन्यजी महाराज यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून बालवयातच विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. पालकांनी गीता, उपनिषदे आदी ग्रंथांचे मराठी अनुवाद वाचून त्यांतील मूल्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या संस्कारांसाठी करावा, असे त्यांनी सांगितले.
सांगली शिक्षण संस्थेचे चालक तथा कार्यक्रमाध्यक्ष श्री. बिपिन कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “संस्कृत ही केवळ परीक्षेतील गुणांकनाची भाषा नसून सर्वविध गुणवर्धनाची भाषा आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, कौशल्ये आणि सकारात्मक विचार विकसित करण्यासाठी संस्कृतमधील सुभाषिते व कथा अत्यंत उपयुक्त आहेत. भारताला लाभलेल्या संस्कृतच्या समृद्ध परंपरेतील मूल्यांचे पुढील पिढीकडे संक्रमण झाल्यास सुदृढ राष्ट्रनिर्मितीस निश्चितच चालना मिळेल.”
मान्यवरांचे आभार केंद्राच्या संचालिका सौ. श्रीशा रामदासी यांनी मानले, तर सूत्रसंचालन कु. आस्था ओगले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलपती प्रो. अतुल वैद्य, विस्तार सेवा मंडळाचे संचालक डॉ. पराग जोशी (रामटेक,नागपूर) यांचे मार्गदर्शन लाभले. श्रावणी पत्की, श्रद्धा मुळगुंद, बाळकृष्ण गोसावी, सलील गोहाड, तनिष्का वडेर, हर्षला कुलकर्णी आणि संतोष भट यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले.
मुंबई, पुणे, वाशिम, नांदेड, रत्नागिरी, सातारा आदी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी, शिक्षक व संस्कृतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या