प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येथील
शिक्षण, संशोधन आणि साहित्यसेवा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. (डॉ.) प्रकाश शंकरराव चिकुर्डेकर यांची सांगली येथील श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
चिकुर्डे, ता.- वाळवा, जिल्हा- सांगली गावातून शिक्षणाची वाटचाल सुरू केलेल्या डॉ. चिकुर्डेकर यांनी एम.ए., बी.एड., एम.फिल. आणि पीएच.डी. (हिंदी) या उच्च शैक्षणिक पात्रता संपादन केल्या आहेत. शिवाजी विद्यापीठात सर्वोच्च प्रथम श्रेणी प्राप्त करून त्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली. शिक्षण क्षेत्रातील तब्बल ४१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५ वर्षे पदवी स्तरावर आणि २६ वर्षे पदव्युत्तर स्तरावर व शांतिनिकेतन सांगली येथे सहा वर्ष प्राथमिक स्तरावर अध्यापन करून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचे शेकडो विद्यार्थी आज महाराष्ट्रातील आणि देशातील कानाकोपऱ्यात विविध पदावरती कार्यरत आहेत.
वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये हिंदी साहित्याविषयीची आवड निर्माण केली. २००३ पासून पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक संशोधक घडविले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५ संशोधकांनी पीएच.डी. आणि ३ विद्यार्थ्यांनी एम.फिल. पदवी संपादन केली आहे. सध्या ५ संशोधक त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य करीत आहेत.
डॉ. चिकुर्डेकर यांचे ‘रामदरश मिश्र के उपन्यासों में समाज-जीवन’ (२००३) या संशोधनग्रंथाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून ‘आधुनिक हिंदी साहित्य में वैषम्य विविध के आयाम’ (२०१६) हा ग्रंथही विशेष चर्चेत राहिला आहे. शंभरहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी ३६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. ५०० पेक्षा अधिक व्याख्यानांद्वारे साहित्य, संशोधन आणि शिक्षणाचा प्रसार केला आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी बातमीदार म्हणूनही पंधरा वर्षाहून अधिक काळ काम केले आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी करण्यात आला आहे. त्यामध्ये अमनसिंह आत्रेय राष्ट्रीय पुरस्कार (२००३), साहित्य रत्न सन्मान (२०२४, टोकियो, जपान), विश्वगुरू भारत गौरव सन्मान (२०२४), ग्लोबल पीस अवॉर्ड (२०२४) आणि भारतेंदू हरिश्चंद्र हिंदी सेवी सन्मान (२०२५) यांचा समावेश आहे.
यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाला चौथ्यांदा 'नॅक', ए प्लस मानांकन मिळवून देण्यात तसेच शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षणात ‘A+’ श्रेणी प्राप्त करण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
डॉ. चिकुर्डेकर यांची नियुक्ती झालेल्या श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाची सांगली जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून ओळख आहे. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाची स्थापना श्री गुजराती सेवा समाज, सांगली या संस्थेने महिलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केली आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रातही या महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. विनय कोरे, डॉ . व्ही. व्ही. कार्जीनी यांनी डॉ. चिकुर्डेकर यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी गुजराती सेवा समाज, सांगलीचे अध्यक्ष कांतीभाई वामझा, उपाध्यक्ष डॉ. महेश शाह, सचिव रमणीकभाई दावडा, संचालक रितेशभाई शेठ, मनीलाल पटेल, सुरेश पोकार, प्रभारी प्राचार्य डॉ. एल. आर. पाटील, कार्यालयीन अधीक्षक विशाल देवके, प्रा. डॉ अमोल पाटील, वैभव गवळी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी डॉ. चिकुर्डेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या