सांगली प्रतिनिधी : सांगली- मिरज- कुपवाड महापालिका क्षेत्रातील वीज वितरण व्यवस्थेतील विविध समस्या सोडवण्यासाठी महावितरणमार्फत २५० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर करण्यात यावा, अशी मागणी समाजसेविका तथा एमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेड (MSEBHCL) यांच्या स्वतंत्र संचालक श्रीमती नीता श्रीरंग केळकर यांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून शहरातील वीज पायाभूत सुविधांवर ताण वाढला आहे. ग्रामीण भागासाठी विविध योजना उपलब्ध असल्या तरी ड वर्ग महापालिका क्षेत्रासाठी अशा स्वरूपाच्या योजना नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यासाठी महापालिका क्षेत्रात ३३ केव्ही रिंग मेन वाहिनीचे नेटवर्क उभारणे, सर्व ३३ व ११ केव्ही उपरी वीजवाहिन्या भूमिगत करणे, ११ केव्ही व लघुदाब वाहिन्यांचे एरियल बंच्ड केबलमध्ये रूपांतर करणे, अतिभारित यंत्रणा कमी करण्यासाठी नवीन रोहित्र केंद्रे उभारणे तसेच जागेअभावी आधुनिक जीआयएस (कॉम्पॅक्ट) उपकेंद्रांची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या कामांमुळे वीज पुरवठा अधिक विश्वासार्ह होईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल, नवीन ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी देणे शक्य होईल आणि शहरातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता प्रभावीपणे करता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
महापालिका क्षेत्रातील वीज वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विविध कामांचा डीपीआर तयार करण्यासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी श्रीमती नीता केळकर यांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. या निधीमुळे शहरातील वीजविषयक अनेक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या