प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली - राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात NTA ने देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या NEET (UG) 2026 च्या 3 मे रोजी पार पडलेल्या परीक्षेची पारदर्शकता धोक्यात आल्याच्या कारणास्तव ती संपूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील हजारो NEET इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.
NTA ने 12 मे 2026 रोजी जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, 8 मे रोजी केंद्रीय यंत्रणांकडे या प्रकरणाची चौकशी सोपवल्यानंतर मिळालेल्या प्राथमिक तपासातील निष्कर्षांच्या आधारे हा कठोर निर्णय घेण्यात आला. भारत सरकारच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे.
CBI चौकशीचे आदेश
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने तो केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI कडे सोपवला आहे. NTA ने चौकशीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे आणि माहिती CBI ला देण्याचे आश्वासन दिले आहे.
विद्यार्थ्यांसाठी दिलासा
नवीन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. यापूर्वी भरलेली परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत करण्यात येईल आणि नवीन परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असे NTA ने स्पष्ट केले आहे. नवीन परीक्षेच्या तारखा आणि प्रवेशपत्राबतची माहिती NTA च्या अधिकृत संकेतस्थळवर जाहीर केली जाईल.विद्यार्थी आणि पालकांनी फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि सोशल मीडियावरील अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन NTA ने केले आहे. अधिक माहितीसाठी 011-40759000, 011-69227700 या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या