प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : “शक्तीपीठ महामार्ग रद्द करा” या मागणीसाठी नेवरी ते घोगाव सुरू असलेल्या आत्मक्लेश पायी पदयात्रेला भाळवणी गावात उत्स्फूर्त आणि तीव्र प्रतिसाद मिळत आहे. पलूस-कडेगाव शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकरी, महिला भगिनी, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
भाळवणी गावात पदयात्रेचे आगमन होताच ग्रामस्थांनी आंदोलनकर्त्यांचे जल्लोषात स्वागत केले. महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने पदयात्रेतील प्रमुख कार्यकर्त्यांचे औक्षण करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी गावातील मातीत कपाळाला टिळा लावत “जमीन वाचवण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करू” अशी शपथ आंदोलनकर्त्यांनी घेतली. या प्रसंगामुळे संपूर्ण वातावरण भावनिक आणि संघर्षमय झाले होते.
महामार्गामुळे सुपीक जमीन, शेती, पिके, घरे आणि भविष्यातील उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “जमीन आमची, निर्णय आमचा”, “निसर्ग वाचवा, शेतकरी वाचवा” अशा घोषणा देत भाळवणीतील महिला भगिनींनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. आपल्या पिढ्यानपिढ्या सांभाळलेल्या जमिनी जाणार असल्याने कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या पदयात्रेत सहभागी शेतकरी व ग्रामस्थांनी सरकारने तात्काळ शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी जोरदार मागणी केली. भाळवणीमध्ये आंदोलन अधिक तीव्र झाले असून गावोगावी शेतकरी संघटित होत असल्याचे चित्र दिसून आले.
या आंदोलनासाठी पलूस-कडेगाव शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती सातत्याने जनजागृती करत असून विविध गावांमध्ये ग्रामसभा, बैठका आणि पदयात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आंदोलनाची भूमिका पोहोचवत आहे.
यावेळी संघर्ष समितीला मार्गदर्शन करणारे ॲड. दीपकदादा लाड तसेच श्री. दास होनमाने यांनी शेतकरी, निसर्ग आणि ग्रामीण अस्तित्व वाचवण्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन केले. “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
“शक्तीपीठ नको, निसर्ग वाचवा – शेतकरी वाचवा” या घोषणांनी भाळवणी परिसर दणाणून गेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या