प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगरपालिका हद्दीतील भिलवडी नाका ते विटा रोड बायपास रस्त्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने संतापाची लाट उसळली असून, संबंधित शेतकऱ्यांनी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. “जमीन शासनाने घेतली, पण मोबदला मात्र अद्याप मिळालाच नाही,” असा आरोप करत सोमवार दि. ०८ जून २०२६ पासून तासगाव सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.भिलवडी नाका ते विटा रोड बायपास मंजूर झाल्यानंतर संबंधित भूसंपादन प्रक्रियेत एकूण ३१ गटांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी १३ गटांच्या इंडेमिनिटी बॉण्डनुसार तब्बल १४ कोटी २७ लाख ८६ हजार २९१ रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत मा. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर यांच्या मार्फत मंत्रालयातील कार्यासन अधिकारी (रस्ते-७) यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
मात्र,या मंजूर रकमेपैकी केवळ दोन गटांनाच नुकसानभरपाई मिळाली असून उर्वरित ११ गटांतील शेतकरी अजूनही हक्काच्या मोबदल्यापासून वंचित आहेत.अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच खैरात मिळत असल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.“शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना शासनाने तत्परता दाखवली, मात्र मोबदला देताना दिरंगाई का?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, आंदोलनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
आंदोलनात सहभागी होणारे शेतकरी :
दिनकर भगवान भोसले, मनोज जगन्नाथ पाटील, पंढरीनाथ भगवान भोसले, सतिश रामचंद्र कोकणे, चंद्रकांत शिवाजी माळी, संजय धोंडीराम माळी, भरत शिवाजी माळी, सौ. वंदना अरुण पाटील, वसंत रामचंद्र डिसले, नामदेव रामचंद्र डिसले, दत्तात्रय पांडुरंग कदम, नामदेव रामचंद्र कदम आणि सौ. विजया लक्ष्मण थोरात.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या