प्रतिष्ठा न्यूज
खरसुंडी प्रतिनिधी : जागतिक संग्रहालय दिनानिमित्त खरसुंडी येथील जावीर काष्ट शिल्प चित्र संग्रहालयात आयोजित कवी संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना गझलकार व कवयित्री नंदिनी साळुंखे-पाटील यांनी, “रमेश जावीर यांनी नैसर्गिक काष्ट शिल्प कलेचा जागतिक वारसा जपत माणदेशाचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवले आहे,” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे आयोजन साहित्यिक तथा कलाकार रमेश जावीर यांनी केले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून नंदिनी साळुंखे-पाटील उपस्थित होत्या. तसेच प्रतिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराजे जाधव यांच्यासह मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
नंदिनी साळुंखे-पाटील पुढे म्हणाल्या की, रमेश जावीर यांनी झाडांच्या मूळ खोडांमधून पक्षी, प्राणी आणि मानवी आकृत्यांची नैसर्गिक काष्ट शिल्पे शोधून त्यांना कलात्मक रूप दिले आहे. तसेच अनेक नवोदित चित्रकारांच्या चित्रांचे जतन करून त्यांनी कला संवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य उभे केले आहे. साहित्य, कला आणि संस्कृतीचा हा अनोखा वारसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गीतकार ग. दि. माडगूळकर, कथाकार व्यंकटेश माडगूळकर , ऐतिहासिक कादंबरीकार ना. स. ईनामदार , दलित भाष्य कार ॲड. शंकरराव खरात यांचे साहित्य साता समुद्रा पार झाले आहे . अलीकडच्या काळात साहित्य निर्मितीसह का ष्ट शिल्पकलेत रमेश जावीर यांनी हे संग्रहालय उभारून मानदेश कला वारसा जगाच्या नकाशावर गडद झाला आहे. साहित्यिक समाजातील विखुरलेली नीतिमूल्य गोळा करत असतो तो आपल्या साहित्यातून अर्पण करीत असतो. असे भावपूर्ण उद्गार गझलकार , कवयित्री नंदिनी साळुंखे पाटील यांनी काढले.
प्रमुख पाहुणे प्रा. साहेबराव चौरे यांनी रमेश जावीर यांच्या साहित्यिक आणि कलात्मक कार्याचा गौरव करताना, “होलार समाजातील पहिले साहित्यिक म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली असून साहित्य आणि कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे,” असे सांगितले.
कवी संमेलनात सुनील दबडे, मेघा पाटील, बाबासाहेब कोकरे, स्मिता साळुंखे-पाटील, सुनील जवंजाळ, रमेश जावीर, अनिल पाटील, शंकर भजनावळे, तानाजी जाधव आदी कवींनी कविता सादर केल्या. तसेच हर्षद मकरंद जावीर याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या