सांगली प्रतिनिधी : राज्यभरात महिला व अल्पवयीन मुलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर आता सामाजिक संघटना अधिक सक्रिय होताना दिसत आहेत. याच अनुषंगाने अजिंकियन वुमेन फाऊंडेशनच्या वतीने महिला आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षा, जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक उपक्रमांच्या प्रभावी समन्वयासाठी सांगली जिल्हाधिकारी मैनाक घोष आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण भागांमध्ये विशेष जनजागृती अभियान राबवून महिलांना कायदे, सुरक्षा उपाय आणि हेल्पलाईन यांची माहिती देण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी अजिंकियन वुमेन फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. मंजीरीताई गाडगीळ म्हणाले की,” केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. महिला व अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर सतर्कता समित्या, समुपदेशन केंद्रे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.”यावेळी अजिंकियन वुमेन फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. मंजीरीताई गाडगीळ यांनी प्रशासनाशी संवाद साधताना महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. महिला सुरक्षेसाठी कठोर अंमलबजावणीसोबतच सामाजिक मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी अजिंकियन वुमेन फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. मंजीरीताई गाडगीळ,रिता शहा,निमिषा कल्याणी,उज्ज्वला चाफळकर,तृप्ती पटवर्धन,स्मिता घेवारे,केतकी जोशी,कविता कुलकर्णी,अश्विनी गाडगीळ आदी फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्यात नव्याने चर्चेला सुरुवात झाली असून प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या