प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : नागाव कवठे येथील नागनाथ मंदिरातील चोरीप्रकरणाचा तपास करण्यासाठी गेलेल्या तासगाव पोलिसांवर तुरची फाटा येथील पारधी वस्तीत काही जणांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकारात तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून पोलीस वाहनाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागाव कवठे येथील नागनाथ मंदिरातून काही दिवसांपूर्वी दागिने चोरीला गेले होते. या चोरीप्रकरणी तासगाव पोलीस तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली होती. तसेच गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुरची फाटा येथील पारधी वस्तीत राहणाऱ्या काही संशयितांचा या चोरीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आला होता.
त्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी आणि संतोष माळी हे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास संबंधित वस्तीत चौकशीसाठी गेले होते. पोलिसांनी संशयितांच्या घरांची तपासणी केली असता त्यांना कटावणी तसेच तोंडाला बांधण्यात येणारे मास्क आढळून आले. हे साहित्य सीसीटीव्ही फुटेजमधील साहित्याशी साधर्म्य असलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर पोलिसांनी काही संशयितांकडे अधिक चौकशी सुरू केली. त्यावेळी काही महिलांनी व स्थानिकांनी पोलिसांच्या कारवाईस विरोध करत आरडाओरडा केला. काही वेळातच परिसरात गर्दी जमा झाली. पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांना वाहनात बसविताना काही जणांनी वाहनावर दगडफेक केल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
या दगडफेकीत पोलीस वाहनाच्या समोरील काचेचे नुकसान झाले. तसेच अमर सूर्यवंशी यांच्या छातीला दगड लागून दुखापत झाली, तर संतोष माळी यांनाही मार लागला. पोलीस कर्मचारी सुरेश भोसले यांच्या हाताला एका महिलेने चावा घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. जखमी पोलिसांवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्यातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत काही संशयितांना ताब्यात घेतले. काही जण घटनास्थळावरून निघून गेल्याने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी जखमी पोलीस कर्मचारी सुरेश भोसले यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयश्री शिवाजी चव्हाण, बबलू पपलू शिंदे, पूजा हिंमत शिंदे, प्रशांत हिंमत शिंदे, अरविंद राजू चव्हाण आणि मच्छिंद्र श्रीशैल चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर तुरची फाटा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या