तासगाव : तासगाव तालुक्यात वन विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कामे मजूर सोसायट्यांना दिली आहेत, मात्र यापैकी अनेक कामांत मजूर नावाला आणि अधिकारी कामाला,अशी अवस्था असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.या कामाच्या माध्यमातून मजूर सोसायटीच्या नावावर अधिकाऱ्यांची ठेकेदारी सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.चार गावांतील १२ कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वन विभागाच्या वतीने तालुक्यातील वडगाव,डोंगरसोनी, जरंडी,आरवडे या गावांमध्ये बंधारा बांधणे,खड्डे पाडणे,रोपवाटिका दुरुस्ती करणे यांसह अन्य कामे मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी जवळपास २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.ही कामे तालुक्यातील निवडक मजूर सोसायट्यांना देण्यात आली आहेत. काम वाटप करताना मर्जीतील संस्थेला काम दिले जाते.अनेक कामांवर मजूर सोसायटीचे कोणीही मजूर दिसत नाहीत.केवळ जेसीबी काम करताना दिसत आहे.याबाबत स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थ यांच्याशी संपर्क साधला असता,या कामावर मजूर सोसायट्यांचे कोणीच येत नाही. विभागाचे अधिकारीच काम करत असल्याची माहिती दिली.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मजूर सोसायटीच्या नावावर कामे असल्याचे देखील माहित नाही. संबंधित अधिकारीच त्यांच्या स्तरावर काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.स्थानिक कामावर जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली असता त्यांनी, वन विभागाच्या वतीने कामे सुरू असल्याचे सांगितले.मात्र कामांबाबत स्थानिक संस्था किंवा ग्रामस्थांना कोणतीही माहिती दिली जात नाही.आमच्याकडे माहिती नाही,अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.मजूर सोसायटी पदाधिकारी व अधिकारी यांचे लागेबांधे असल्याचे दिसत आहे.मजूर सोसायट्या केवळ बिल काढायला असतात; मात्र काम करायला अधिकारीच असल्याची चर्चा आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या