प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांच्या पथकाने इनोव्हा कारमधून गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपीचा तब्बल ४५ मिनिटे थरारक पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून १३४ किलो गांजा, इनोव्हा कार, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ तस्करीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे व त्यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
दि. २० मे २०२६ रोजी पोहेकॉ. संदिप नलावडे व सागर लवटे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एका सोनेरी रंगाच्या बिना नंबर प्लेटच्या इनोव्हा कारमधून बारामती येथील एक इसम मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन तासगावमार्गे सांगलीकडे येत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे कवलापूर येथे सापळा रचण्यात आला. दरम्यान, संशयित इनोव्हा कार भरधाव वेगाने येताना दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता वेगाने पलायन केले.
त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोटारसायकल व खासगी वाहनांच्या सहाय्याने माधवनगर, संजयनगर, अहिल्यानगर, रामरहीम कॉलनी परिसरातून आरोपीचा पाठलाग सुरू ठेवला. पोलिसांनी याबाबत संजयनगर व एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यांना माहिती दिली. अखेर सुमारे ४५ मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर जुना जकात नाका, कुपवाड चौक येथे संशयित वाहन अडवून चालकाला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने आपले नाव विकी विजय कांबळे (वय ३२, रा. भिमनगर, पिंपळी रोड, जाळोची, ता. बारामती, जि. पुणे) असे सांगितले. वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता डिकीत ६६ खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेल्या पॅकेटमध्ये १३४ किलो तयार गांजा आढळून आला.
पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा गांजा ओडिशा राज्यातून आणल्याची कबुली दिली. सांगलीतील पप्पू फाकडे यांना हा माल देण्यासाठी तो बारामतीहून मायणी-विटा-तासगाव मार्गे सांगलीकडे येत असल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून ३३ लाख ५० हजार रुपये किंमतीचा १३४ किलो गांजा, ९ लाख रुपये किंमतीची सोनेरी रंगाची बिना नंबरची टोयोटा इनोव्हा कार, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गांजा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्यातील ४७८ किलो गांजा प्रकरणातही तो पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या