प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: तासगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय सुभाष हावळे यांच्याविरोधात विवाहित महिलेला अश्लील व प्रेमाचे संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वाघापूर येथील ३२ वर्षीय विवाहित महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. तिच्या पतीचा पंजाब येथे गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय असून ते अधूनमधून गावाकडे येत असतात. दरम्यान,आरोपी दत्तात्रय हावळे यांचा गोठा संबंधित महिलेच्या घराशेजारी असल्याने दोघांची ओळख झाली होती.मात्र,या ओळखीचाच गैरफायदा घेत आरोपीने महिलेला मोबाइलवरून सतत मेसेज व कॉल करून त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, २ एप्रिल २०२६ पासून आरोपीने महिलेला रात्री-अपरात्री टेक्स्ट व व्हॉट्सॲप संदेश पाठवण्यास सुरुवात केली.
८ एप्रिल रोजी पाठविण्यात आलेल्या संदेशांमध्ये “तुम्ही मला आवडता…”, “तुम्ही खूप सुंदर दिसता…”, “मला झोप येत नाही…”, “मला तुम्हाला भेटायचे आहे…”, “मला वेळ द्या…”, “मला किस करायचा आहे…”, “माझ्यावर विश्वास ठेवा…”, “मला तुमचे प्रेम पाहिजे…” अशा आशयाचे संदेश पाठवून महिलेला मानसिक त्रास दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने १५ एप्रिल रोजी आरोपीचा व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक केला. मात्र, त्यानंतरही आरोपीने तिचा पाठलाग करणे, रस्त्यात हातवारे करणे तसेच पुन्हा मेसेज पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याचा आरोप आहे.
१७ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पुन्हा मेसेज पाठवण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.संबंधित विवाहित महिलेचा मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर अखेर तिने तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी आरोपी दत्तात्रय हावळे यांच्याविरोधात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दत्तात्रय हावळे हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष असून स्थानिक राजकारणात त्यांची सक्रिय ओळख आहे.आमदार रोहित पाटील यांचे समर्थक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.त्यामुळे या प्रकरणानंतर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या असून विविध स्तरांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या