तासगाव:तासगाव-कवठेमहांकाळच्या द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आशादायी घडामोड घडली असून, तासगाव येथे प्रस्तावित ‘आर. आर. पाटील तासगाव आंतरराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र’ (RRP-TIGRC) उभारणीच्या दिशेने राज्य शासनाने सकारात्मक पाऊल टाकले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आ. रोहित पाटील यांनी सादर केलेला सविस्तर प्रस्ताव स्वीकारत कृषी आयुक्तांना तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिल्याने द्राक्ष पट्ट्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील मंत्रालयात बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीस कृषी सचिव, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषि संचालक अंकुश माने, द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष जगन्नाथ मस्के, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, संभाजी पाटील, संदीप पाटील, रामदास जाधव, चंद्रकांत लांडगे, जालिंदर मस्के यांच्यासह द्राक्ष उत्पादक शेतकरी व कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत भारत-कॅलिफोर्निया द्राक्ष शेती तंत्रज्ञान सहकार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. रोहित पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर या विषयाला गती मिळाली होती. त्यानंतर शासन पातळीवर हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.आ. रोहित पाटील यांनी तासगाव येथे जागतिक दर्जाचे द्राक्ष संशोधन व काढणीपश्चात तंत्रज्ञान केंद्र उभारण्याचा विस्तृत आराखडा शासनासमोर मांडला. या केंद्रासाठी अमेरिकेतील University of California Davis, California Table Grape Commission, USDA Agricultural Research Service आणि Fresno State Viticulture and Enology Research Center यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे तांत्रिक सहकार्य प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे तासगावचा द्राक्ष पट्टा थेट जागतिक तंत्रज्ञानाशी जोडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रस्तावित केंद्रामध्ये द्राक्ष व बेदाणा उत्पादन, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, निर्यात मानके, अवशेष चाचणी प्रयोगशाळा, शीतगृह सुविधा, प्रक्रिया उद्योग, संशोधन आणि शेतकरी प्रशिक्षण अशा अत्याधुनिक सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. विशेषतः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नियंत्रित वातावरण साठवणुकीचा अभाव, दलालांवरील अवलंबित्व आणि निर्यात प्रक्रियेतील अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने या केंद्राची आवश्यकता अधिक अधोरेखित झाली आहे.बैठकीनंतर बोलताना आ. रोहित पाटील म्हणाले, “तासगाव-कवठेमहांकाळ आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी जागतिक दर्जाचे द्राक्ष व बेदाणे पिकवतात. मात्र त्या गुणवत्तेला जागतिक बाजारपेठेशी जोडणारी सक्षम संशोधन व प्रक्रिया यंत्रणा उपलब्ध नाही. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि कृषी आयुक्तांना दिलेले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश हे शेतकऱ्यांसाठी मोठे आशादायी पाऊल आहे. शासनाची औपचारिक मान्यता मिळाल्यानंतर कॅलिफोर्नियातील संस्थांशी समन्वय साधून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे.”दरम्यान, या संकल्पना नोंदीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरण २००१’ अंतर्गत सांगलीसाठी स्वतंत्र संस्था आणि महाराष्ट्र द्राक्ष मंडळ उभारण्याची घोषणा झाली होती. मात्र तब्बल पंचवीस वर्षांनंतरही ती प्रत्यक्षात आलेली नाही. त्यामुळे आता प्रस्तावित संशोधन केंद्राच्या माध्यमातून तासगावच्या द्राक्ष पट्ट्याला नवी दिशा आणि जागतिक ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.विधानसभेत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनीदेखील द्राक्ष व बेदाणा उत्पादकांच्या संरक्षणासाठी आणि तासगाव येथे संशोधन केंद्र उभारणीसाठी सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिल्यानंतर या प्रकल्पाला आणखी बळ मिळाले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रकल्प भविष्यातील ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याची भावना आता व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या