गगनबावडा : 'देव, देश आणि धर्म' या त्रिसूत्रीचा प्रसार करणारे ध्येयवेडे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान युवा नेते संदीप रघुनाथ पाटील यांची भाजपा कोल्हापूर जिल्हा सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे निवडे (ता. गगनबावडा) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
संदीप पाटील हे गगनबावडा तालुक्यात 'मुलुख मैदान तोफ' म्हणून ओळखले जातात. अत्यंत परखड, स्पष्ट वक्ता आणि हजरजबाबी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जनमानसात मोठी पकड आहे. पक्षाचे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेने केल्याची पावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
देश, राज्य आणि जिल्ह्यात सत्तास्थानी असलेल्या जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या जिल्हा सचिवपदी निवड होणे, ही गगनबावडा तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे. "गरुडाला भरारी घेण्यासाठी आकाश मोकळे असते", हे संदीप पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे, अशा शब्दांत त्यांचे कौतुक होत आहे.
या निवडीनंतर संदीप पाटील यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे भाजपची तालुक्यातील आणि जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या