सांगली : सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये विकासाची नवी पहाट उगवत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि दर्जेदार बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते तब्बल १ कोटी २५ लाख ८५ हजार रुपयांच्या निधीतून पूर्ण झालेल्या तसेच अंतिम टप्प्यात असलेल्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
“विकास हाच आमचा धर्म आणि जनतेचा विश्वास हेच आमचे बळ,” असा संदेश देत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रभाग क्रमांक १८ मध्ये रस्ते, गटार आणि मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देत विकासाची गती अधिक वेगवान केली आहे. या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या अंतर्गत साईनाथ नगर, हनुमान नगर येथील गल्ली नं. ०२ मधील गटार कामासाठी २६ लाख ८८ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून काम पूर्णत्वास आले आहे. तसेच हनुमान नगर गल्ली नं. ०४ मधील अंतर्गत रस्ते व गटार कामासाठी २१ लाख ०५ हजार रुपये निधीतून विकासकामे करण्यात आली आहेत.
धामणी रोड ते हनुमान नगर गल्ली नं. ०५ येथील गटार कामासाठी १८ लाख ५८ हजार रुपये निधी खर्च करण्यात आला असून महावीर कॉलनी एरसेड भवनजवळ धामणी रोड परिसरातील गटार कामासाठी २८ लाख ३४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय सांगली-कोल्हापूर रोड परिसरातील आकाशवाणीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या यशोदा पार्क, राजपूत शाळेजवळ दक्षिण, उत्तर, पूर्व व पश्चिम बाजूस रस्ता डांबरीकरणासाठी १५ लाख रुपये निधीतून काम सुरू करण्यात आले आहे. तसेच अनमोल कॉलनी येथे भिलवडे सर कार्यालय ते निखील घाटगे घरापर्यंत रस्ता करण्यासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
या विकासकामांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १८ मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लागणार असून नागरिकांना उत्तम रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन आणि दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास नगरसेविका गाथाताई काळे-जगदाळे, वैशालीताई गवळी, अलकाताई ऐवले, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोहित जगदाळे, सुनील माणकापुरे,प्रमोद नलवडे, शक्ती केंद्र प्रमुख राजू गवळी, शैलेश पवार, मंडलाध्यक्ष राहूल नवलाई, मंडल सरचिटणीस चंदन सनदी, सारंग साळुंखे, शार्दुल थिटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या