सांगली प्रतिनिधी: सांगली शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांच्या दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम, सुरक्षित व सुकर व्हावी यासाठी स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या तब्बल ५१ लाख ३५ हजार रुपयांच्या रस्ते विकास व गटार कामांचा लोकार्पण सोहळा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या विकासकामांमुळे परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकार्पण करण्यात आलेल्या कामांमध्ये पेठभाग भाजी मंडई परिसरातील अंतर्गत रस्ता सुधारणा कामासाठी २५ लाख १८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच बाळकृष्ण मालवणकर ज्वेलर्स ते बाबू मास्तर घोरपडे चौक या मार्गावरील डांबरीकरण रस्त्यासाठी ८ लाख ४३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. याशिवाय नवसंदेश बोळ येथे रस्ता व गटार बांधकामासाठी १७ लाख ६९ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
या प्रसंगी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगितले की, “प्रभाग १४ च्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून नागरिकांना मूलभूत सुविधा दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. रस्ते, गटार, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही.”
स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही या विकासकामांमुळे परिसराच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या लोकार्पण सोहळ्यास आमदार सुधीरदादा गाडगीळ, नगरसेवक केदार खाडीलकर, नगरसेवक उदय बेलवलकर, नगरसेविका अनिताताई पवार, मनीषाताई कुकडे, नितीनकाका शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप कुकडे, मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, मंडल सरचिटणीस किरण कपाले, शुभम चव्हाण, सिद्धार्थ विभूते, उद्योजक प्रशांत शहा, सारंग साळुंखे तसेच परिसरातील नागरिक, व्यापारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या