फलटण : शिक्षक बदली प्रक्रियेत सवलती मिळवण्यासाठी काही महिला शिक्षकांकडून घटस्फोटाच्या तरतुदींचा गैरवापर होत असल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. कागदोपत्री घटस्फोट दाखवून संवर्ग एकचा लाभ घेतला जात असताना प्रत्यक्षात मात्र संसार पूर्ववत सुरू असल्याचे काही प्रकरणांत दिसून येत असल्याने शिक्षण क्षेत्रातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात २०१८ पासून प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत दिव्यांग आणि घटस्फोटीत महिला शिक्षकांना विशेष सवलती देण्यात आल्या. शासनाचा उद्देश प्रत्यक्ष अडचणीत असलेल्या महिलांना दिलासा देण्याचा होता. मात्र काही ठिकाणी या तरतुदींचा गैरफायदा घेतला जात असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात, विशेषतः फलटण तालुक्यात सुरू आहे.
एका महिला शिक्षिकेने १८ ते २० वर्षांचा संसार केल्यानंतर २०२३ मध्ये घटस्फोट घेतल्याची नोंद आहे. यंदाच्या बदली प्रक्रियेत त्यांनी घटस्फोटीत संवर्गाचा लाभ घेत इच्छित ठिकाणी बदली मिळवल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर झालेल्या नव्या घराच्या वास्तुशांती कार्यक्रमात संबंधित शिक्षिका आणि त्यांचे माजी पती एकत्र धार्मिक विधी करताना दिसल्याची चर्चा रंगली. या कार्यक्रमातील काही छायाचित्रे सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याचे बोलले जात आहे.
यामुळे “घटस्फोट केवळ कागदावरच होता का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. बदली प्रक्रियेत सवलती मिळवण्यासाठी न्यायालयीन कागदपत्रांचा वापर करून प्रत्यक्षात सहजीवन कायम ठेवले जात असल्यास, तो शासन व प्रशासनाची दिशाभूल ठरू शकतो, अशी भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणे दुर्गम भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. काही शिक्षक संघटनांनी अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. घटस्फोटानंतरचे प्रत्यक्ष राहणीमान, संयुक्त आर्थिक व्यवहार, मालमत्ता व्यवहार, कौटुंबिक कार्यक्रमांतील उपस्थिती आदींची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, शासनाने यापूर्वीच घटस्फोटीत महिला शिक्षकांच्या पुनर्पडताळणीबाबत आदेश दिले असल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने प्रत्यक्ष घरी जाऊन पडताळणी करावी, तसेच बोगस प्रकरणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शिक्षक हा समाजाचा आदर्श मानला जातो. त्यामुळे वैयक्तिक फायद्यासाठी नियमांचा गैरवापर होत असल्याची भावना निर्माण होणे हे शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेचे मानले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या