भिलवडी प्रतिनिधी : “छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि धर्मरक्षणासाठीचे बलिदान हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. युवकांनी त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी कार्य केले पाहिजे,” असे प्रतिपादन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप (आप्पा) कदम यांनी केले. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे खंडोबा तालमीच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
मिरवणुकीदरम्यान धर्मवीर संभाजी महाराज की जय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. भगव्या पताकांनी सजलेल्या गावातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. गावातील प्रमुख मार्गांवर नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करत छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना प्रदीप (आप्पा) कदम म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या जीवनातील त्याग, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. युवकांनी इतिहास जाणून घेऊन समाजहित, राष्ट्रहित आणि संस्कार जपण्याचे कार्य करावे. महान व्यक्तिमत्त्वांचे स्मरण हे केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचे आचरण करणे अधिक महत्त्वाचे आहे.”
कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. अनेक युवकांनी भगवे फेटे परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता. कार्यक्रमामुळे अंकलखोप परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास खंडोबा तालमीचे अध्यक्ष विनायक कुराडे, उपाध्यक्ष प्रथमेश यादव, शुभम वाघमारे, स्वप्निल जाधव, प्रतीक बंडलकर, आयन कुलकर्णी, उदय धन्याळ, सचिन गावडे, कैलास वासुदेव, सुफियान कुलकर्णी, यश यादव, विक्रम सुतार, प्रसाद चौगुले, पारस मदने, स्वप्निल कोळेकर यांच्यासह ग्रामस्थ, युवक मंडळाचे कार्यकर्ते, तालमीतील सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक म्हण आहे की, अच्छे विचारोंका असर समाजपर इसलिए नही होता क्योंकि, लिखनेवाले और पढने वाले दोनो यह समझते है यह दुसरों केलिए है | अगदी त्याचप्रमाणे बोलणारे आणि ऐकणारे दोघेही समजतात की हे दुसऱ्या साठी आहे. बोलणारा पूर्ण तयारी निशी आलेला असतो. तो त्याला दिलेल्या वेळेनुसार लंबेचौडे भाषण करतो, ऐकणारे भाषणाची मजा घेतात आणि अधूनमधून दाद देतात आणि मोठा गाजावाजा होतो सभा संपते. लोक सगळे विसरून आपापल्या घरी जातात किंवा समारंभ कसा भारी झाला याचीच चर्चा करत घरी जातात फार तर खाण्यापिण्याची काही सोय असेल तर उत्तमच. वक्ता आपली ठरलेली बिदागी घेऊन पुढील सुपारी असेल तर तिकडे नाही तर घरी जातो. एक इव्हेंट पार पडतो. आजकाल छ. शिवाजी महाराज किंवा छ. संभाजी महाराज यांची जयंती किंवा पुण्यतिथी बद्दल साधारण असेच चित्र असते. मोठमोठे देखावे, रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, भव्य दिव्य मिरवणूका, भाषणे असे इव्हेंट चे स्वरूप महापुरुषांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथीला आलेले आहे. परंतु महापुरुषांच्या विचारांचे अनुकरणाचे काय. शिवछत्रपतींचा आदर्श घ्यावा पण इतरांनी ते आपल्या साठी नाही असेल प्रत्येकाला वाटते. आणि त्यामुळेच समाजात सध्या दुर्वर्तन, दुराचार, व्यसनाधीनता, खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार, सामान्य माणसाची लुबाडणूक दिल्ली पासून गल्ली पर्यंत सर्वत्र चालू आहे. हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र नक्कीच नाही. इथे फक्त बोलघेवडे आणि स्वार्थी, भ्रष्टाचारी पुढारी आहेत.ते उठता बसता शिवछत्रपतींचा जयघोष करतात पण कामाचे काय❓ ते कुठे महाराजांचे आहे.
उत्तर द्याहटवा