प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:मान्सूनपूर्व तयारीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलावण्यात आलेल्या बैठकीकडे तब्बल १३ विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याच्या घटनेनंतर तासगाव तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र पाटील यांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.आमदार रोहित पाटील यांच्या पुढाकारातून काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. तहसीलदार अतुल पाटोळे यांनी २४ विभागांच्या प्रमुखांना बैठकीबाबत पूर्वसूचना दिली होती. मात्र प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी तब्बल १३ विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे आमदार रोहित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बैठकच रद्द केली होती.या घटनेनंतर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बैठकीला अनुपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ लोकप्रतिनिधींचाच नव्हे, तर शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचाही अपमान केल्याची भावना व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर रवींद्र पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात थेट लढा उभारला आहे. “मान्सूनपूर्व तयारीसारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. अन्यथा प्रशासनावरचा जनतेचा विश्वास उडेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.उपोषणस्थळी तहसीलदार अतुल पाटोळे यांनी भेट देत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी आपले लेखी स्पष्टीकरण सादर केले असून, ते एकत्रित करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावर योग्य ती कारवाई होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.मात्र रवींद्र पाटील यांनी “जिल्हाधिकाऱ्यांनी मला लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा उपोषण सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका घेतली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून पाटील यांच्याशी संवाद साधत उद्या लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही लेखी आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आज सकाळपासून सुरू झालेल्या या आमरण उपोषणाला रोहित पाटील समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. त्यामुळे प्रशासनाविरोधातील जनक्षोभ आणखी तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि गैरहजर अधिकाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या