प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव परिसरात अपघाताच्या गोंधळाचा फायदा घेत दरोडा टाकणाऱ्या टोळीचा तासगाव पोलिसांनी थरारक पद्धतीने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जप्त करण्यात आली असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणातील फिर्यादी विकास मोहन पाटील (वय २४, व्यवसाय – दुकानदारी, रा. भांबर्डे, ता. खानापूर, जि. सांगली) हे २७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एर्टिगा (MH 10 CA 3423) कारमधून पत्नी वृशाली यांच्यासह विटा रोडने तुरची येथे जात होते. बोरगाव हद्दीत मदने मळा परिसरात त्यांच्या गाडीचा रस्त्यालगत उभ्या असलेल्या आयशर ट्रकला धडक बसून अपघात झाला.या अपघातात फिर्यादी व त्यांच्या पत्नी जखमी झाले असताना मदतीऐवजी आरोपींनी निर्दयीपणे त्यांचा गैरफायदा घेतला.जखमी अवस्थेत असलेल्या दाम्पत्याच्या गळ्यातील सुमारे ५ तोळे वजनाची सोन्याची चेन आणि मिनी मंगळसूत्र हिसकावून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची गंभीर दखल घेत तासगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. १९०/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०४ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास करत संशयितांचा माग काढला. अखेर ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री ११.०४ वाजता पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शरद दिनकर मदने (वय २३), भरत दिनकर मदने (वय २१), आनंदा बाळासो मदने (वय ३१) आणि अतुल दादासो मदने (वय २५) यांचा समावेश असून सर्वजण मदने वस्ती, लिंब (ता. तासगाव) येथील रहिवासी आहेत.पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून ५ लाख रुपये किमतीची ५ तोळे वजनाची सोन्याची होलो चेन पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आली.ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दिपक पाटील,पोहेकॉ अभिजीत गायकवाड, बजरंग थोरात, अमर सूर्यवंशी, सुरेश भोसले तसेच पोशि विवेक यादव, सुरज जगदाळे, संतोष माळी, सागर पाटील आणि तानाजी शिंदे यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली.दरम्यान, अपघाताच्या घटनांमध्ये अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, तसेच तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. या कारवाईमुळे तासगाव परिसरातील गुन्हेगारांना मोठा इशारा मिळाला असून पोलिसांच्या दक्षतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या