प्रतिष्ठा न्यूज
तोंडोली/ शिवाजी मोहिते
सातारा सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथे श्री अंबिका देवीच्या पारंपरिक यात्रेला आज पहाटेपासून उत्साहात सुरुवात झाली. निसर्गरम्य वातावरणात, त्रिवेणी ओढ्याच्या संगमावर वसलेल्या या जागृत तीर्थक्षेत्रात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हिरव्यागार झाडीत वसलेले अंबिका मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले असून, देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या.
यात्रेचा मुख्य दिवस आज असल्याने धार्मिक विधींना विशेष महत्त्व देण्यात आले. पहाटे तीन ते साडेपाच या वेळेत भाविकांनी दंडस्नान करून यात्रेची सुरुवात केली. त्यानंतर साडेचार वाजता महाअभिषेक, साडेपाच वाजता देवीचा पोशाख आणि सव्वा सात वाजता मंत्रोच्चारात महाआरती संपन्न झाली. सकाळी साडेआठ वाजता भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसभर दर्शनासाठी आलेल्या माहेरवाशिणी व सासरवाशिणी सुहासिनींनी देवीची मनोभावे पूजा करून खणा-नारळांनी ओटी भरली. पंचारतीने ओवाळणी करत भक्तांनी आपल्या नवसांची पूर्तता केली. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या दर्शन सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले.
सायंकाळी समाजाचा मानाचा गोंधळ सादर करण्यात आला. त्यानंतर देवीची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघाली. पालखीसमोर आकर्षक आतिषबाजी, झांज पथक, संभळ, हलगी, करंडी, तसेच सनई-तुतारीच्या निनादात वातावरण भारावून गेले. कडेगाव येथील मानाच्या ब्रास बँड पथकाच्या सुरेल वादनाने यात्रेची शोभा अधिकच खुलली. यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून, रात्री बहारदार लावणी सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
अंबिका यात्रा कमिटी, ग्रामपंचायत तोंडोली, ग्रामविकास मंडळ तसेच जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट (मुंबई-ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव पार पडत आहे.
जगदंबेच्या पौर्णिमेच्या निमित्ताने गेली तीस वर्षे सुरू असलेले अन्नदानाचे कार्य यंदाही मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले असून, विजय सूर्यवंशी पाटणकर शेठ यांच्या पुढाकारातून भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या निमित्ताने तोंडोली गावात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या