गगनबावडा : तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात गेल्या तीन दशकांपासून ज्यांच्या नावाचा दरारा आणि आदराचा शब्द राहिला, असे गगनबावड्याचे लाडके नेतृत्व कै. उदयसिंह उर्फ बाळ पाटील साहेब यांच्या स्मृती आजही जनसामान्यांच्या मनात घर करून आहेत. साहेब म्हणजे केवळ एक नाव नसून, ते विकासाचे एक ‘विद्यापीठ’ होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज गगनबावडा तालुका प्रगतीच्या मुख्य प्रवाहात उभा आहे.
घरातील 'संत तुकाराम' आणि दातृत्वाचा वारसा
साहेबांच्या दातृत्वाची महती सांगताना त्यांचे निकटवर्तीय आजही भावूक होतात. ज्याप्रमाणे संत तुकोबांनी लोकांचे कर्ज माफ करून आपले सर्वस्व अर्पण केले, तोच वारसा साहेबांनी चालवला. म्हणूनच त्यांना प्रेमाने घरातील ‘संत तुकाराम’ मानले जाई. कोणाचे लग्न असो, शिक्षण असो वा आजारपण; साहेबांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परतले नाही. विशेष म्हणजे, त्यांनी केलेली मदत कधी कोणासमोर बोलून दाखवली नाही की ती परत मिळण्याची अपेक्षा केली नाही. साहेबांच्या खोलीत दररोज भरणारा ‘मदतीचा दरबार’ ही त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष होती.
टीकेची तमा न बाळगता उभारले ‘साखर कारखान्याचे’ साम्राज्य
गगनबावड्याच्या डोंगरदऱ्यांत साखर कारखाना उभा करणे ही एकेकाळी अशक्य गोष्ट मानली जात होती. साहेबांनी जेव्हा 'सप्तगंगा सहकारी साखर कारखान्याची' (आजचा पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना) मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा अनेकांनी त्यांची थट्टा केली. मात्र, टीकेला उत्तर न देता त्यांनी थेट मॉरिशस गाठून तिथल्या साखर उद्योगाचा अभ्यास केला. प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून, जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा कारखाना उभा केला. आज हाच कारखाना तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा बनला आहे.
शिक्षण आणि रोजगाराची क्रांती
"शिक्षणाशिवाय समाज बदलणार नाही," या विचारातून त्यांनी असळज परिसरात माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. आज या विद्यालयातून शिकलेले अनेक तरुण विविध सरकारी पदांवर आणि कारखान्यात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. असळजमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते, जे त्यांच्या शैक्षणिक तळमळीचे प्रतीक होते.
माणसे पारखण्याची अफाट दृष्टी
साहेबांकडे माणसे ओळखण्याची विलक्षण कला होती. १९९६ च्या निवडणुकीत त्यांनी मा. विनय कोरे साहेब आणि मा. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्यातील नेतृत्वगुण ओळखले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक कार्यकर्ते आज जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. "दारात माणसांची गर्दी, म्हणजे साहेब घरी आहेत," हे समीकरणच तालुक्यात रूढ झाले होते.
अपूर्ण स्वप्ने आणि मार्गदर्शक दिशा
तालुक्यात मिनी एम.आय.डी.सी. उभारण्याचे त्यांचे स्वप्न जरी अपूर्ण राहिले असले, तरी त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही तालुक्याला प्रगतीकडे नेत आहे. प्रतिकूल परिस्थितीत ताठ कण्याने कसे जगावे, याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या संघर्षातून घालून दिला.
अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वास आणि गगनबावड्याच्या विकासासाठी आयुष्य वेचणाऱ्या महामानवास संपूर्ण तालुक्याच्या वतीने कोटी कोटी अभिवादन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या