तासगाव : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि द्राक्ष सेवनाला धार्मिक व सांस्कृतिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने “यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोडूसर कंपनी” तर्फे गेल्या चार वर्षांपासून महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी “द्राक्ष दिन” साजरा करण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाला आता भारत सरकारकडून पेटंट मान्यता प्राप्त झाली असून, द्राक्ष उत्पादकांसाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
या मान्यतेमुळे महाशिवरात्रीच्या दिवशी “द्राक्ष दिन” साजरा करण्याच्या परंपरेला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक स्तरावर आणि मोठ्या उत्साहात राबविण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
भगवान शंकराला रुद्राक्ष अत्यंत प्रिय मानले जाते. “रुद्राक्षातील ‘रु’ काढले तर द्राक्ष” या भावनिक आणि श्रद्धापूर्ण संकल्पनेतून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला द्राक्ष अर्पण करणे, पिंडीवर वाहणे आणि प्रसाद म्हणून द्राक्ष सेवन करणे अत्यंत शुभ मानले जात आहे. अनेक भक्तांच्या मते यामुळे मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा निर्माण होत आहे.
महाशिवरात्रीच्या कालावधीत द्राक्षांचा हंगाम जोमात असतो. बाजारात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उपलब्ध असतात. त्यामुळे या दिवशी देशभरात द्राक्ष सेवन आणि द्राक्ष अर्पणाची परंपरा वाढल्यास द्राक्ष विक्रीला मोठी चालना मिळू शकते. याचा थेट फायदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून, त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.
भारताच्या कानाकोपऱ्यात भगवान शंकराची मंदिरे आहेत. कन्याकुमारीपासून कैलास पर्वतापर्यंत प्रत्येक गावात महादेव मंदिर आढळते. प्रत्येक मंदिरात भगवान शंकराला नैवेद्य म्हणून द्राक्ष अर्पण केली गेली आणि प्रसाद म्हणून द्राक्ष सेवन केले गेले, तर एका दिवसात प्रचंड प्रमाणात द्राक्षांची मागणी निर्माण होऊ शकते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सध्या देशात अंदाजे ३२ लाख टन द्राक्ष उत्पादन घेतले जाते. मात्र प्रत्येक व्यक्तीने केवळ २०० ग्रॅम द्राक्ष सेवन केली, तरी एका दिवसासाठी कोट्यवधी टन द्राक्षांची आवश्यकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे द्राक्ष शेतीच्या विस्ताराला आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला मोठी चालना मिळू शकते.
“यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोडूसर कंपनी” गेल्या चार वर्षांपासून या उपक्रमाचे महत्त्व समाजात पोहोचविण्याचे काम करत आहे. सुरुवातीला दोन गावांत सुरू झालेला हा उपक्रम आता महाराष्ट्रातील सुमारे सात हजारांहून अधिक गावांत उत्साहात साजरा केला जात असल्याचा दावा संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
भगवान शंकराला द्राक्ष अर्पण करणे, विविध मान्यवर व लोकप्रतिनिधींना “द्राक्ष तुला” करणे तसेच लोकांमध्ये द्राक्ष सेवनाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व पटवून देण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे.
यावेळी संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले की, योग दिन, महिला दिन, कामगार दिन किंवा इतर विशेष दिवसांप्रमाणे “द्राक्ष दिन” देखील देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला द्राक्ष अर्पण करून, प्रसाद म्हणून द्राक्ष सेवन करून आणि या उपक्रमाचा प्रचार करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावावा, असे आवाहन यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे विजय कुंभार यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या