गगनबावडा : तालुक्यात चोवीस तास खडा पहारा देऊन कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या खाकी वर्दीलाच आता मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. गगनबावडा पोलीस ठाण्याची दिमाखदार नवी इमारत उभी राहिली, संरक्षण भिंतही झाली; मात्र ज्या पोलिसांनी रात्री-अपरात्री जनतेच्या रक्षणासाठी धावून जायचे, त्यांच्याच डोक्यावर हक्काचे छप्पर नाही! येथील पोलीस लाईन (क्वार्टर्स) गेल्या तब्बल १५ वर्षांपासून बंद आणि अत्यंत जीर्ण, मोडकळीस आलेल्या अवस्थेत प्रशासकीय अनास्थेची साक्ष देत उभी आहे. परिणामी, तालुक्यातील सुमारे ३० पोलीस कर्मचाऱ्यांना निवासासाठी भाड्याच्या घरांचा शोध घ्यावा लागत आहे, तर काहींना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
जीवघेणा प्रवास आणि अपघातांचे सत्र!
बाहेरील जिल्ह्यांतून आणि तालुक्यांतून गगनबावड्यात कर्तव्य बजावण्यासाठी येणाऱ्या पोलिसांचे हाल तर बघवत नाहीत. ड्युटी संपल्यानंतर थकल्या-भागल्या शरीराने पोलिसांना कोल्हापूर किंवा इतर दूरच्या गावांवरून रोज प्रवास करावा लागतो. काही महिन्यांपूर्वीच दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा घरी परतताना भीषण अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेले एक पोलीस कर्मचारी अद्यापही ड्युटीवर रुजू होऊ शकलेले नाहीत. या गंभीर घटनेनंतरही गृह विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही, याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
साडेतीन एकर जागा असूनही ‘सरकारी खो’
पोलीस स्टेशनच्या आवारातच तब्बल साडेतीन एकर शासकीय जागा उपलब्ध आहे. एवढी मोठी जागा असतानाही तिथे पोलिसांसाठी नवीन निवासस्थाने बांधण्यात प्रशासनाला काय अडचण आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जर या जागेत सुसज्ज पोलीस क्वार्टर्स उभारले, तर आणीबाणीच्या प्रसंगी किंवा रात्रीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संपूर्ण पोलीस बळ तात्काळ उपलब्ध होऊ शकते. मात्र, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे लालफितीत अडकला आहे.
"मी स्वतः साळवणला भाड्याने राहतोय..."
"पोलीस क्वार्टर्स उपलब्ध नसल्यामुळे मला स्वतःला कोल्हापूरहून ये-जा करावी लागते आणि सध्या मी साळवण येथे भाड्याचे घर घेऊन राहत आहे. माझे कुटुंब कोल्हापुरातच आहे. बहुतांश कर्मचारी कोल्हापूर किंवा दूरवरून प्रवास करतात. पोलीस ठाण्यालगत साडेतीन एकर जागा उपलब्ध आहे. तिथे जर नवीन क्वार्टर्स झाले, तर पोलिसांचा वेळ वाचेल आणि तातडीच्या प्रसंगी सर्व पोलीस कर्मचारी एकाच ठिकाणी हजर राहू शकतील."
– भारत साळुंखे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गगनबावडा)
१५ वर्षांचा वनवास: गगनबावडा पोलीस क्वार्टर्स गेल्या दीड दशकापासून बंद आणि भूतबंगला बनण्याच्या वाटेवर.
३० पोलिसांचा जीव टांगणीला: हक्काचे घर नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसून खाजगी खोल्यांमध्ये राहावे लागत आहे.
सुरक्षेचा बोजवारा: अपघात होऊन कर्मचारी जखमी होत असतानाही वरिष्ठ प्रशासन सुस्त.
जागा असूनही उदासीनता: साडेतीन एकर जागा धूळ खात पडून; लोकप्रतिनिधींचे या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
आता तरी गृहविभाग जागे होणार का?
नेत्यांच्या दौऱ्यांसाठी आणि व्ही.आय.पी. बंदोबस्तासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या पोलिसांच्या या हक्काच्या मागणीकडे आता तरी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहणार का? की आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहिली जात आहे? असा संतप्त सवाल गगनबावड्यातील जनतेतून विचारला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या