प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसेच कॉर्पोरेट कंपन्यांकडून सुरू असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या (AIOCD) वतीने बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी औषध दुकान बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात तासगाव तालुक्यातील तब्बल २१० हून अधिक मेडिकल स्टोअर्स सहभागी होणार असून, आज दिवसभर तालुक्यातील बहुतांश औषध दुकाने बंद राहणार आहेत.तासगाव तालुका औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील कदम, सोमेश्वर खरारे, निळकंठ टिंगरे, संदीप पाटील, सागर पाटील आणि जितेंद्र माने यांनी संयुक्त पत्रकार निवेदनाद्वारे ही माहिती दिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व औषध विक्रेते सांगली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बंदच्या अनुषंगाने तासगाव तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तासगावचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांची भेट घेत अधिकृत निवेदन सादर केले. तसेच आंदोलन शांततेत पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली.दरम्यान, १५ मे ते १९ मे या कालावधीत तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून तसेच दुकानांवर काळे फलक लावून शासनाचा निषेध नोंदवला होता. मात्र, शासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने अखेर १०० टक्के दुकान बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
“आमच्या न्याय्य मागण्यांसाठी केंद्रीय मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत वारंवार निवेदने पोहोचवली. तरीदेखील शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे नाईलाजाने बंदचे पाऊल उचलावे लागत आहे. तासगाव तालुक्यातील सर्व औषध विक्रेते या लढ्यात एकजुटीने सहभागी झाले आहेत,” असे तालुकाध्यक्ष सुनील कदम यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या