गगनबावडा : उन्हाळ्याचा वाढता कडाका, मान्सूनोत्तर पावसाने वेळेत घेतलेली एक्झिट आणि यंदा उन्हाळ्यात वळीव पावसाने दिलेल्या तीव्र ओढीमुळे गगनबावडा तालुक्यातील मुख्य धरणांमधील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर तालुक्यांची भाग्यरेषा ठरलेल्या लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्पासह कोदे लघु प्रकल्पातील पाणीपातळी लक्षणीय खाली आली आहे. यामध्ये कुंभी धरणातील साठा गेल्या पाच वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्याने चिंतेचे वातावरण आहे.
कुंभी मध्यम प्रकल्प: गेल्या ५ वर्षांतील सर्वात कमी साठा
तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या कुंभी धरणाची स्थिती यंदा चिंताजनक आहे. कडक उन्हाळा आणि शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या पाण्याच्या अतिउपशामुळे धरणाने तळ गाठायला सुरुवात केली आहे.
चालू स्थिती (मे २०२६): सध्या धरणामध्ये केवळ २८.४४ द.ल.घ.मी. (३६.९९%) पाणी शिल्लक आहे.
मागील वर्षांशी तुलना: गेल्या वर्षी म्हणजेच मे २०२५ मध्ये धरणामध्ये तब्बल ४७.०३% (३६.१५६ द.ल.घ.मी.) साठा होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा सुमारे १० टक्क्यांनी कमी झाला आहे. अगदी २०२२ ते २०२४ या काळातही मे अखेरचा साठा ३९% ते ४१% च्या दरम्यान स्थिर होता, यंदा मात्र तो थेट ३६.९९% वर घसरला आहे.
कोदे लघु प्रकल्पाची स्थितीही बिकट
लहान पण अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोदे लघु प्रकल्पातही पाण्याची पातळी झपाट्याने खाली आली आहे.
चालू स्थिती (मे २०२६): कोदे धरणामध्ये सध्या फक्त १.०९ द.ल.घ.मी. (१७.९८%) पाणी शिल्लक आहे.
मागील वर्षांशी तुलना: गेल्या वर्षी (२०२५) याच काळात हे धरण ३१.१७% भरलेले होते. गतवर्षीच्या तुलनेत कोदे धरणाचा साठा १३ टक्क्यांनी खालावला आहे. जरी २०२२ (८.९१%) आणि २०२४ (१०.०६%) च्या तुलनेत यंदा स्थिती थोडी बरी असले, तरी १७.९८% साठा पुढील काही दिवस पुरवणे हे मोठे आव्हान असणार आहे.
धरणनिहाय चालू स्थिती :
( सोबत कुंभी व कोदे प्रकल्पाचा पाच वर्षांचा आढावा तक्ता आहे )
पाणी कमी होण्याची मुख्य कारणे:
१. कडाक्याचा उन्हाळा व वळीव दडी: यंदा मार्च ते मे दरम्यान उन्हाची तीव्रता प्रचंड होती. त्यातच परतीच्या आणि वळीव पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्यामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने झाले.
२. शेतीसाठी वाढता पाणी उपसा: पाऊस वेळेत निघून गेल्यामुळे उन्हाळी पिके आणि ऊस जगवण्यासाठी शेतकऱ्यांना धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा करावा लागला.
प्रशासनाचे आवाहन:
" कुंभी मध्यम प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असून ऑगस्ट अखेर पाणी पुरवठा करण्याच्यादृष्टीने नियोजन केले आहे.तथापि यावर्षी अल निनो प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा."
- अजिंक्य पाटील, शाखा अभियंता , पाटबंधारे, कळे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या