तासगाव:तासगाव तालुक्यातील वायफळे गावातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आमदार रोहित पाटील यांच्यासमोर पाणी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र “आता वेळ नाही, पुढच्या गावात जायचे आहे,” असे सांगत आमदारांनी चर्चा टाळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वायफळे गावाचा समावेश तासगाव-कवठेमहांकाळऐवजी खानापूर-आटपाडी मतदारसंघात करावा, अशी मागणी पुढे आणली आहे.
सोमवारी आमदार रोहित पाटील यांनी वायफळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली होती.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बसून पाणी प्रश्नावर चर्चा करण्याची विनंती केली.मात्र आमदारांनी वेळ नसल्याचे कारण देत तेथून निघून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
गेल्या काही महिन्यांपासून टेंभू योजनेचे पाणी गावात पोहोचले नसल्याने द्राक्षासह इतर पिके धोक्यात आली आहेत. शेजारच्या गावांपर्यंत पाणी पोहोचत असताना वायफळेला मात्र एक थेंबही मिळाला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.“पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर आमदारांना वेळ नसेल, तर आम्हाला न्याय देणारा मतदारसंघ हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन मतदारसंघ बदलाचा ठराव करण्याबाबत गावात चर्चा सुरू झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या