प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज: नारी शक्ती वंदन विधेयक फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त मिरज मार्केट परिसरात आक्रोश मोर्चाचे शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, “महिलांना विधिमंडळात योग्य प्रतिनिधित्व मिळणे ही केवळ मागणी नसून लोकशाहीची मूलभूत गरज आहे. अशा महत्त्वाच्या विधेयकाला नकार देणे म्हणजे स्त्री सक्षमीकरणाच्या प्रवासाला अडथळा निर्माण करणे होय.”
त्या पुढे म्हणाल्या, “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांनी आरक्षणाच्या माध्यमातून आपली कार्यक्षमता आणि नेतृत्व यशस्वीपणे सिद्ध केले आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र स्तरावरही महिलांना समान संधी देण्यास विरोध करणे योग्य नाही. आरक्षणामुळे गुणवत्ता कमी होते, हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा असून महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक आहे.”
स्वातीताई खाडे यांनी यावरही भर दिला की, “महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षितता जितकी महत्त्वाची आहेत, तितकेच निर्णय प्रक्रियेत महिलांचा आवाज पोहोचण्यासाठी त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवणे गरजेचे आहे. नारी शक्ती वंदन विधेयक फेटाळणे हे महिलांच्या हक्कांच्या लढ्यातील एक पाऊल मागे टाकणारे ठरते.”
“या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा आणि महिलांना समान संधी देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्त्री ही समाज आणि राष्ट्राची खरी शक्ती असून तिच्या सक्रिय सहभागाशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ नेत्या सुमनताई खाडे समाजकल्याण सभापती गीता पवार, जि प सदस्य मंजश्री कांबळे, माजी महापौर संगीता खोत, नगरसेविका योगिता राठोड, उज्वला कांबळे, प्राजक्ता धोतरे, विद्या नलवडे, कीर्ती देशमुख, आदी तर पदाधिकारी ज्योती कांबळे,रूपाली देसाई, अनिता हारगे, शोभा गाडगीळ, अनघा कुलकर्णी, रिद्धी म्हामुलकर, विद्या दानोळे, अनुराधा कोरे, गंगूताई नाईक, अलका ऐवळे, अंजना कडोलेकर, काम आदी मान्यवर कार्यकर्त्या, महिला व युवती उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या