सांगली : चिमण्यांची घटती संख्या लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक अभिनव उपक्रम सांगलीत राबवण्यात आला. हिंदवी फाउंडेशन, सांगलीवाडी आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 31 मार्च 2026 रोजी ‘जागतिक चिमणी दिना’निमित्त रंगभरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना सह्याद्री प्रतिष्ठान सांगलीचे जिल्हाध्यक्ष विजय खेत्रे यांनी मांडली होती.
या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वयोगटानुसार पाच गट करण्यात आले होते आणि प्रत्येक गटातून प्रथम पाच विजेत्यांची निवड करण्यात आली. या उपक्रमासाठी हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक अभिजीत कोळी, कलाशिक्षक विजय कोळेकर तसेच एमआयटी स्कूलचे मुख्याध्यापक चेतन सोनावणे आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षकवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्पर्धेची खास वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थ्यांनी रंगवलेली चिमणीची घरटी त्यांनाच घरी नेण्यासाठी देण्यात आली. या माध्यमातून ‘प्रत्येक घराजवळ चिमण्यांसाठी सुरक्षित निवारा’ हा संदेश देण्यात आला.
याशिवाय, ज्या घरट्यात चिमणी येऊन वास्तव्यास राहील, त्या विद्यार्थ्यांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक विद्यार्थ्यांनी चिमण्या घरट्यात बसल्याचे व्हिडिओ सादर केले आहेत.
दरम्यान, स्पर्धेच्या पुढील टप्प्यात परीक्षक विद्यार्थ्यांच्या घरी भेट देणार असून, ज्या घरट्यात प्रत्यक्ष चिमणी वास्तव्य करताना आढळेल, त्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या