प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहराच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा प्रश्नावर अखेर ठोस निर्णय झाला असून, धनगाव पाणी योजनेतील मोटर पंप, इलेक्ट्रिक पॅनेल्स आणि ट्रान्सफॉर्मर तासगाव नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला असून, त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.या निर्णयामुळे तासगाव नगरपालिकेला सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांच्या यंत्रसामग्रीचा थेट लाभ मिळणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे पाईपलाईन वगळता इतर सर्व यंत्रसामग्री पालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या हस्तांतरणासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीस ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, तसेच नगराध्यक्षा विजया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत शहराच्या पाणीप्रश्नावर सकारात्मक चर्चा होऊन तातडीने मान्यता देण्यात आली.बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद आणि तासगाव नगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संबंधित सर्व विभागांनी या निर्णयाला सहमती दर्शविल्याने पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कोट्यवधींची यंत्रसामग्री पालिकेच्या ताब्यात येत असल्याने तासगावकरांची पाण्यासाठीची होणारी ओढाताण कमी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निर्णयाचे शहरातून स्वागत होत असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
"तासगाव शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. जनतेला दिलेला शब्द आज संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास नेला आहे. या हस्तांतरणामुळे तांत्रिक अडथळे दूर होऊन शहराला वाढीव आणि शुद्ध पाणी वेळेवर मिळेल. तासगावकरांच्या हितासाठी आमचा पाठपुरावा असाच सुरू राहील."
— युवानेते प्रभाकर पाटील
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या