प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 23 : बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरूद्ध जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, तसेच समितीचे अशासकीय सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील, सुरेश भोसले आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तसेच अवैधरित्या लॅबोरेटरी चालवणाऱ्या व्यावसायिकांचा शोध घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकांची यादी वेबसाईटवर प्रसिध्द करावी. बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळल्यास त्याची माहिती शासकीय यंत्रणेला देण्यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक निर्माण करावा. सदरच्या संपर्क क्रमांकाच्या माहितीबाबतचा फलक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालये तसेच अन्य सर्व शासकीय रूग्णालयाच्या ठिकाणी लावावा. बोगस वैद्यकीय व्यावयासिकांबाबत विविध माध्यमातून जनजागृती करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
वैद्यकीय व्यावसायिकांना वैद्यकीय परिषदेने घेतलेला क्यूआर कोड दर्शनी भागात लावण्याबाबत अवगत करावे, याची तपासणीही करावी. पॅथोलॉजी रिपोर्ट पॅथोलॉजीस्ट डॉक्टरांनीच तपासून त्यांच्या सहीने देणे आवश्यक आहे. याबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत जिल्ह्यातील बेकायदेशीर लॅबोरेटरी चालकांवर कारवाई करण्यासाठी सर्वेक्षण करावे. जिल्ह्यात अवैधरित्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधोपचार करणाऱ्या बोगस व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच, अनधिकृत डेंटल लॅब चालविणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्याबाबत सूचित करण्यात आले. तसेच बैठकीत विविध मु्द्यांवर चर्चा करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी बैठकीत उपस्थित विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने वैद्यकीय कायद्याच्या परिभाषेच्या अनुषंगाने मत मांडले. प्रारंभी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या