मिरज : स्थानिक पीएम श्री मिरज हायस्कूल, मिरज येथे 'राष्ट्रीय आविष्कार अभियान' योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालय, मिरज येथील मराठी विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी गुंफले. "बालपणी अभ्यासासाठी साध्या कंदीलचीही सोय नव्हती, मात्र दिव्याच्या उजेडात अभ्यास करून ज्ञानावर अढळ विश्वास ठेवला आणि आज जीवन बदलले. तुम्हीही जिद्द आणि कष्टाच्या जोरावर तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता," असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र नागरगोजे होते.
खडतर प्रवासाने विद्यार्थी भारावले
डॉ. शिंदे यांनी आपल्या व्याख्यानातून त्यांच्या बालपणातील संघर्षाचा आणि यशाचा प्रवास उलगडला. तो ऐकून उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले. त्यांनी मिरज हायस्कूलच्या ऐतिहासिक वारशाचा गौरव केला. तसेच थॉमस अल्वा एडिसन यांची प्रेरणादायी गोष्ट सांगत सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व समजावून सांगितले. निसर्गातील विविध अनुभव सांगत असतानाच त्यांनी काही कविता आणि गाणी सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
मोबाईलपासून लांब राहण्याचा सल्ला
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शिंदे म्हणाले की, "हायस्कूलचे जीवन म्हणजे कुंभारकाम करण्यासारखे आहे, जिथे तुमच्या व्यक्तिमत्वाला हवा तसा आकार देता येतो. आजच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये 'अभावाचा अभाव' आहे. परिस्थितीच माणसाला संघर्ष करायला शिकवते, त्यामुळे कोणत्याही संकटाने डगमगून जाऊ नका." यावेळी त्यांनी मराठी शाळेचे महत्त्व अधोरेखित करतानाच, मोबाईलचे व्यसन मानवी संस्कृतीसाठी घातक ठरू शकते, असा इशारा देत विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहावे, असा मोलाचा सल्ला दिला.
उपस्थिती आणि आभार
या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शुभांगी तेली यांनी केले, तर आभार श्री. संजय दुधाळ यांनी मानले. या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद निर्माण करणारा ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या