प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तालुक्यात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून अंधश्रद्धेच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक आणि मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांच्या अवैध संपत्तीची चौकशी करावी,अशी मागणी राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.प्रशांत केदार, प्रमिला गावडे, सृष्टी कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तासगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक पुरुष व महिला वैयक्तिक समस्यांनी त्रस्त होऊन या स्वयंघोषित बाबांच्या दरबारात जात आहेत. मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तींना करणी, भूतबाधा, अशुभ शक्तींची भीती दाखवून त्यांच्याकडून विविध पूजा, होम-हवन, ताईत, दोरे-गंडे यांच्या नावाखाली पाच हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात आहे.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, काही भोंदूबाबांनी सोशल मीडियावर चमत्कारांचे व्हिडिओ, रिल्स आणि पोस्ट टाकून अंधश्रद्धेला खुलेआम खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे. काही वर्षांपूर्वी सामान्य मजुरी करणारे तरुण आज आलिशान गाड्यांतून फिरताना दिसत असून, या मागे अंधश्रद्धेच्या नावाखाली उभारलेले कोट्यवधींचे साम्राज्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे.विशेष म्हणजे एजंटमार्फत समस्याग्रस्त नागरिकांना दरबारात आणून, “उज्वल भविष्य” दाखवण्याचे आमिष दाखवले जाते. त्यानंतर विविध धार्मिक विधींच्या नावाखाली आर्थिक, मानसिक आणि सामाजिक शोषण केले जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.“विज्ञान युगात चमत्कारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालण्याऐवजी पोलिसांनी कठोर कारवाई करावी,” अशी मागणी करत संबंधित भोंदूबाबा आणि भोंदू महिलांची कसून चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर युनूस कोल्हापूरे, निशांत आवळेकर, प्रमिला गावडे, विजयाताई माळी, अंकुश केंगार, संजय देवकुळे, शुभम केंगार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या