प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : जे भांडणात पुढे जातील तेच भाकरी खातील अशी सध्या जगाची शोकांतीका आहे. अशी खंत व्यक्त करून जग बदलण्याची जबाबदारी आता साहित्यिकांनी उचलली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी केले. प्रतिष्ठा फौंडेशन आयोजित तासगाव येथील दशक महोत्सवी प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
तासगाव येथील समृध्दी मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या या संमेलनात राज्यभरातील साहित्यिकांनी सहभाग नोंदवला. ज्येष्ठ संपादक वसंत भोसले हे उद्घाटक होते. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम हे स्वागताध्यक्ष होते. बाल साहित्यिक महेशकुमार कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ६० कविंचे कवि संमेलन रंगले. संध्या धर्माधिकारी यांच्या कथाकथनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रास्ताविक प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव यांनी केले. अर्थतज्ज्ञ प्रा.संजय ठिगळे, राष्ट्रपती पदक विजेते शाहीर बजरंग आंबी, माजी प्राचार्य व्ही. एच. पाटील, ज्येष्ठ नाट्य अभिनेते डॉ. दयानंद नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रतिष्ठा राज्यस्तरीय पुरस्कारांचे मान्यवरांच्याहस्ते वितरण करण्यात आले. सौ. विद्या जाधव, पूर्णांक जाधव यांनी संयोजन केले. सौ. सुनिता पाटील व कु. संस्कृति माळी यांनी सुत्र संचालन केले. आनंदराव जाधव यांनी आभार मानले.प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सध्या जगाची जगण्याची परिभाषा बदलली आहे. जे भांडणात पुढे जातील तेच भाकरी खातील अशी आवस्था निर्माण झाली आहे. जग हे बदलणारे नाही तर बिघडणारे झाले आहे. अशा परिस्थितीत साहित्यिकांनी लिहीते झाले पाहिजे. लोकांना वाचायला भाग पाडले पाहिजे. वाचण्या बरोबर विचार करणे आवश्यक आहे. जे विचार करतील तेच आयुष्यात काहीतरी बदल घडवू शकतील. माणसं वाचायला शिकल्या शिवाय लेखक होता येणार नाही. माती खालची माती काय आहे हे अभ्यासण्याची आवश्कता आहे. बिघडणार्या जगाला बदलण्यासाठी साहित्यिकांनी पुढे आले पाहिजे. तासगावमध्ये गेली १० वर्षे प्रतिष्ठा साहित्य समेंलनाच्या माध्यामातून साहित्यिकांना मंच मिळवून देण्याचे काम तानाजी जाधव यांनी अत्यंत कष्टाने केले आहे.
उद्घाटक वसंत भोसले यांनी वाचन चवळवळ निर्माण करण्याचे आवाहन केले. आपल्या भागातील अनेक माणसांनी बाहेर जाऊन कर्तृत्व गाजवले आहे. त्याचा अभ्यास झाला पाहिजे. मोठ्या माणसांची चरीत्रे नव्या पिढीने वाचली पाहिजेत तर त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. मोबाईल हे अत्यंत सुंदर साधन आहे त्याचा आपण वापर कसा करतो त्यावर ते अवलंबून आहे. प्रचंड ज्ञान मोबाईलवर उपलब्ध आहे मनोरंजनाच्या पलिकडे जाऊन ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. प्रतिष्ठा साहित्य संमेलनासारखी संमलने सर्वत्र भरत राहिली पाहिजेत तीच आज उर्जास्त्रोत बनली आहेत.
स्वागताध्यक्ष प्रदीप कदम म्हणाले, साहित्य संमेलने ही संस्काराची केंद्रे आहेत. आज जग भले कोणत्याही मार्गाने जात असले तरी संमेलनांच्या माध्यमातून विचारांची दिशा बदलण्याचे सामर्थ्य सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण करता येते. दशमहोत्सवी प्रतिष्ठा साहित्य संमेलन पुढे शतक महोत्सवी होईल आणि नवनवे साहित्यिक घडत राहतील. माणसांच्या मनातल्या संवेदना मांडण्याचे काम साहित्यिक करतात. म्हणून अशा संमेलनांना समाजाने प्रोत्साहन दिले पाहिजे.
तानाजीराजे जाधव यांनी प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन दहा वर्षे तासगावकरांनी साथ देवून जपलेल वाढविले आणि मोठे केले आहे. यापुढच्या काळात राज्यभर विविध भागात हे संमेलन भरविण्यात येईल. असे सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या