किरण कुंभार
तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी कुमठे गणाच्या अरुणा पाटील यांची, तर उपसभापतीपदी वायफळे गणाचे सुखदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सविता लष्करे यांनी काम पाहिले. यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत तब्बल ३५ वर्षांनंतर संजयकाका पाटील गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या माध्यमातून सत्तांतर घडवून आणत पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला होता. पंचायत समितीत अजित पवार गटाचे ८ सदस्य, शरद पवार गटाचे ३ सदस्य, तर भाजपचा १ सदस्य विजयी झाला आहे.मंगळवारी झालेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीत अजित पवार गटाकडून सभापतीपदासाठी अरुणा पाटील आणि उपसभापतीपदासाठी सुखदेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. शरद पवार गटाकडून सभापतीपदासाठी कल्पना पाटील आणि उपसभापतीपदासाठी विद्याराणी चव्हाण यांनी अर्ज दाखल केले होते.मात्र,ऐनवेळी शरद पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सविता लष्करे यांनी अरुणा पाटील यांची सभापतीपदी आणि सुखदेव पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.निवडीनंतर माजी खासदार संजयकाका पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, डॉ.प्रताप पाटील,बाबासाहेब पाटील,आदींसह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नूतन सभापती आणि उपसभापतींचा सत्कार केला.यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव,महेश पाटील,प्रमोद शेंडगे, ऋषिकेश बिरणे,उमेश पाटील,बालिका माने,राजेश्वरी पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
३५ वर्षांनंतर तासगाव पंचायत समितीत सत्तांतर; अरुणा पाटील सभापती,सुखदेव पाटील उपसभापतीपदी बिनविरोध
By -
मार्च ११, २०२६
0
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या