तासगाव:जागतिक महिला दिनानिमित्त तासगाव पोलीस ठाणे तसेच तासगाव ग्रामीण रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.स्वावलंबी भारत अभियानाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.८ मार्च रोजी येणारा जागतिक महिला दिन यंदा रविवारी आल्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार (१० मार्च) रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यालय अधीक्षक प्रतिभा शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना सांगितले की,मिलिंद सुतार,पवन गंगवानी आणि दिपक शेटे हे गेल्या चार वर्षांपासून महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल स्वावलंबी भारत अभियानाचे त्यांनी आभार मानले.यावेळी पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.प्रमुख वक्ते मिलिंद सुतार यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना सांगितले की, घर, संसार आणि नोकरी अशी अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन अनेकदा होत नाही. त्यामुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम आम्ही राबवत आहोत.ते पुढे म्हणाले की, ८ मार्च १९७५ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने पहिला जागतिक महिला दिन साजरा केला.आज जगभर हा दिवस महिलांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो.भारताच्या संविधानाने महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार दिले आहेत. राजमाता जिजाऊ, छत्रपती ताराराणी, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या महान महिलांचे कार्य आपण दररोज स्मरणात ठेवणे आवश्यक आहे.या प्रसंगी उपस्थित सर्व महिला कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक अकिब काझी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याची कल्पना स्तुत्य असल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वरांजली जगताप यांनी केले, तर अभिजीत गायकवाड यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला पोलीस ठाण्यातील सर्व महिला कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.दरम्यान,स्वावलंबी भारत अभियानाच्या वतीने तासगाव ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी तालुका क्षयरोग पर्यवेक्षक चित्रा कुलकर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमास दिपक शेटे व पवन गंगवानी उपस्थित होते.
“तासगावात महिला शक्तीला सलाम! पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांचा भव्य सन्मान”
By -
मार्च ११, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या