प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.10 : जागतिक महिला दिनानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे परिवहन विभागाच्या विविध सेवांसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास योग शिक्षिका शीतल कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वाहन नोंदणी, वाहन कर भरणा, वाहन परवाना (लायसन्स) संबंधित सेवा तसेच इतर विविध सेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. या सेवांसोबतच नागरिकांना परिवहन विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊन परिवहन विभागासंबंधित माहिती प्राप्त करून घेता येईल. ऑनलाईन सेवा, फेसलेस सेवा, सेवा हमी कायदा, एचआरएसपी, स्क्रॅप पॉलिसी, स्क्रॅपिंग सेंटरची यादी इत्यादी सेवा विभागामार्फत देण्यात येत आहेत.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक नाजनीन बागवान तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या